समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा सर्रास वापर; शासनाच्या आदेशाला ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 08:03 PM2018-07-30T20:03:48+5:302018-07-30T20:09:39+5:30
शहरात शासनाच्या आदेशाला ‘खो’ दिला जात असून, विविध समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा (प्लेट) आणि २०० मिलिपर्यंतच्या बाटल्यांचा सर्रास वापर होत आहे.
औरंगाबाद : शहरात शासनाच्या आदेशाला ‘खो’ दिला जात असून, विविध समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा (प्लेट) आणि २०० मिलिपर्यंतच्या बाटल्यांचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे शासनाने लावलेली बंदी केवळ कागदावरच असल्याचे दिसते.
राज्यात २३ जूनपासून प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, चहाचे कप, ग्लास, चमचे, थर्माकोल ग्लास, पत्रावळी आदींवर बंदी आली आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील प्लास्टिक कप, पत्रावळी, ग्लास, कॅरिबॅग, शॉपिंग बॅग आदींची निर्मिती करणाऱ्या छोटे-मोठ्या उद्योगांकडून सध्या उत्पादन बंद असल्याचे सांगण्यात येते. बाजारपेठेतही बंदी असलेल्या साहित्यांची विक्री होत नसल्याचे सांगण्यात येते. एखाद्याने बंदी असलेल्या साहित्यांची मागणी केल्यानंतर विक्रेत्यांकडून नकार दिला जात आहे. तरीही समारंभांमध्ये थर्माकोल पत्रावळींचा बोलबाला दिसत आहे.
२०० मिलिपर्यंतच्या बाटलीबंद पाणी विक्रीवर बंधने आणली आहेत. त्यामुळे २०० ऐवजी २५०, ३०० आणि ५०० मिलिपर्यंतच्या बाटल्यांच्या निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. विविध कार्यक्रमांमध्ये २०० मिलिपर्यंतच्या बाटलीबंद पाण्याचा वापर होताना दिसतो. समारंभांप्रसंगी पर्यावरणाला अत्यंत घातक ठरणाऱ्या थर्माकोलच्या पत्रावळीचा सध्या बिनधास्त वापर सुरू आहे. स्टीलच्या प्लेटस्, वाट्या, ग्लास वापरले तर त्यांना स्वच्छ करण्याचा त्रास, या सर्व गोष्टींपासून सुटका मिळावी या सबबीखाली या पत्रावळींचा वापर सुरूच आहे.
थर्माकोलच्या पत्रावळी फेकून देण्यात आल्यानंतर त्यामध्ये उरलेले अन्न जनावरेदेखील खातात. अशावेळी पत्रावळीही जनावरांच्या पोटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यावरणासह जनावरांच्या जिवालाही हे धोकादायक ठरत आहे. शहरात आधीच कचऱ्याने राक्षसी रूप धारण केले आहे. बंदीनंतरही थर्माकोलच्या पत्रावळींचा वापर सुरूच आहे. परिणामी पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. समारंभ, अन्य कार्यक्रमांदरम्यान वापरण्यात येणाऱ्या या पत्रावळींचा कचरा ठिकठिकाणी आढळून येत आहे.
थर्माकोलने घोटला नाल्याचा गळा
अख्ख्या औरंगाबाद शहराचा जणू कचरा डेपो बनला आहे. चौकाचौकात, गल्लीगल्लीत कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. यातून शहरातून वाहणारे नालेही सुटले नाहीत. सिटीचौक ते कालादरवाजा या मार्गावरील मोठ्या नाल्याचा गळाच थर्माकोल व प्लास्टिकने घोटला आहे. मोठ्या प्रमाणात कचरा नाल्यात तरंगत आहे. यावरून नष्ट न होणाऱ्या थर्माकोल, प्लास्टिकच्या प्रदूषणाची कल्पना येऊ शकते; मात्र अजूनही महानगरपालिकेचे याकडे लक्ष गेले नाही. येत्या काळात जोरदार पाऊस झाला तर नाल्याचे पाणी आसपासच्या रहिवासी परिसरात शिरू शकते. मनपाच्या अधिकाऱ्यांनी वेळातवेळ काढून थोडे इकडेही लक्ष द्यावे, थर्माकोल काढून नाला मोकळा करावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
उत्पादन की, जुना साठा
प्लास्टिक, थर्माकोल उत्पादनांचा साठा संपविण्यासाठी शासनाकडून वेळ देण्यात आला होता, तरीही अनेकांकडे अद्यापही बंदी असलेल्या उत्पादनांचा साठा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातून छुप्या पद्धतीने त्याची विक्री आणि वापर होत आहे. साठा जरी जुना असला तरी त्याचा वापर केला तर कारवाई होऊ शकते. बंदी असलेल्या वस्तंूचे उत्पादन होत नसल्याचा दावा संघटनांकडून केला जात आहे.
उत्पादन, विक्री बंद
थर्माकोल प्लेटचे उत्पादन आणि विक्री सध्या बंद आहे. व्यापाऱ्यांकडून त्याची कोणत्याही प्रकारे विक्री होत नाही. केटरिंग व्यावसायिकांसह अनेकांनी समारंभांसाठी अनेक दिवसांपूर्वी थर्माकोल प्लेट घेऊन ठेवलेल्या असू शकतात. अशांकडून त्यांचा वापर होऊ शकतो.
- प्रवीण काला, सचिव, मराठवाडा प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन