राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकविजेत्या अभय शिंदेचे जंगी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:22 AM2018-07-29T00:22:47+5:302018-07-29T00:23:21+5:30
इंग्लंड येथील न्यू कॅसल येथील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत कास्यपदक जिंकून भीमपराक्रम करणारा प्रतिभावान खेळाडू अभय शिंदे याचे आज सायंकाळी विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. मूळचा कन्नड येथील असणाऱ्या अभय शिंदे याने न्यू कॅसल येथे झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सायबर प्रकारात कास्यपदक जिंकले होते.
औरंगाबाद : इंग्लंड येथील न्यू कॅसल येथील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत कास्यपदक जिंकून भीमपराक्रम करणारा प्रतिभावान खेळाडू अभय शिंदे याचे आज सायंकाळी विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले.
मूळचा कन्नड येथील असणाऱ्या अभय शिंदे याने न्यू कॅसल येथे झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सायबर प्रकारात कास्यपदक जिंकले होते. पदकविजेती कामगिरी केल्यानंतर अभय शिंदेचे इंग्लंडहून मुंबई येथे सकाळी १० वाजता आगमन झाले आणि मुंबई येथून तो आज दुपारी ४ वाजता औरंगाबादेत दाखल झाला. या वेळी त्याचे खेळाडूंनी जोरदार स्वागत केले. या वेळी राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, आनंद आंचलकर, वीरभद्र गादगे, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे यांच्यासह अभय शिंदेचे वडील कृष्णा शिंदे, आई सुरेखा शिंदे, काका प्रवीण शिंदे, राकेश खैरनार उपस्थित होते.
त्यानंतर अभयचा शिवछत्रपती महाविद्यालयातही सत्कार करण्यात आला. यावेळी अभयसोबत राष्ट्रकुल स्पर्धेत कास्यपदक जिंकणारा कोल्हापूरचा आदित्य अंगल व हर्षदा चमदमकोंडवार हे खेळाडू होते. या प्रसंगी शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य पी. व्ही. अष्टेकर, अभिजित आवरगावकर, नितीन थोरात, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, राज्य संघटनेचे सचिव उदय डोंगरे, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश वंजारे, राकेश खैरनार, संजय भूमकर, सागर मगरे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन आदी उपस्थित होते.
अभयचे भवितव्य उज्ज्वल
राष्ट्रकुल स्पर्धेत अभय शिंदे याने केलेली पदकविजेती कामगिरी ही मराठवाड्यासाठी मोठी अचिव्हमेंट आहे. अभय शिंदे याच्यासह जागतिक स्पर्धेत सहभागी होणारा तुषार आहेर, दुर्गेश जहागीरदार यांचे भवितव्य उज्ज्वल आहे. तुषार आहेर याची आॅस्ट्रेलियात होणाºया सीनिअर राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेसाठी संभाव्य भारतीय संघात निवड झाली आहे. दुर्गेश जहागीदारला प्रशिक्षणासाठी इटली येथे पाठवणार आहे. हे औरंगाबादचे तिन्ही खेळाडू आॅलिम्पिकच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे खेळाडू असल्याचे राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.