२०२ उपकेंद्रांत समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:04 AM2020-12-30T04:04:51+5:302020-12-30T04:04:51+5:30
--- औरंगाबाद ः आचारसंहितेमुळे रखडलेली समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) नियुक्ती प्रक्रिया अखेर सोमवारी पूर्ण झाली. गुणवत्तेनुसार २०२ जणांचे ...
---
औरंगाबाद ः आचारसंहितेमुळे रखडलेली समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) नियुक्ती प्रक्रिया अखेर सोमवारी पूर्ण झाली. गुणवत्तेनुसार २०२ जणांचे समुपदेशन व आवडीनुसार उपकेंद्रांची निवडीची मुभा सीएचओंना देण्यात आली. तर अवघ्या काही मिनिटात नियुक्ती पत्र सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांच्या हस्ते डाॅक्टरांना देण्यात आले. २०२ उपकेंद्रात सीएचओ नियुक्तीने ग्रामीण आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळाली असून पुढील दोन दिवसांत हे सीएचओ रुजू होऊन अहवाल सादर करतील असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके यांनी सांगितले.
आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उपकेंद्रांना श्रेणीवर्धीत करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २७९ पैकी २०२ केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी नेमले जात आहेत. त्यासाठी आयुर्वेद, युनानी आदी डाॅक्टरांना ब्रीज कोर्सच्या प्रशिक्षणाअंती परीक्षेद्वारे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर (सीएचओ) निवड केली. त्यांची उपकेंद्रात नियुक्तीची प्रक्रिया मजनु हिल, टीव्ही सेंटर येथील माैलाना आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात सोमवारी रात्री ८ वाजेपर्यंत पार पडली. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. उल्हास गंडाळ, डाॅ. प्रदीप कुलकर्णी, डाॅ. विजयकुमार वाघ, डाॅ. विनायक मुंडे यांच्यासह राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांनी चोख नियोजन समुपदेशनासाठी केले होते.
सकाळी १० वाजता २५ -२५ च्या गटाने या समुपदेशन प्रक्रियेला सुरुवात झाली. ११.३० वाजता सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष उपकेंद्र निवड इन कॅमेरा प्रक्रियेला करण्यास सुरुवात झाली. डाॅ. गोंदावले यांनी बाहेर उभ्या डाॅक्टरांना पाहिल्यावर त्यांची आत बसण्याची व्यवस्था करायला सांगितले. त्यामुळे ताटकळत उभे डाॅक्टरही सुखावले. तर आरोग्य सभापती डाॅ. अविनाश गलांडे यांनीही प्रक्रियेच्या ठिकाणी भेट देवून नवनियुक्त डाॅक्टरांना चांगले काम करा. म्हणत लवकर रुजू होण्याच्या सुचना दिल्या.
----
खाजगी प्रॅक्टीस करता येणार नाही
---
११ महिन्यांकरीता कंत्राटी पद्धतीने ही नेमणूक आहे. पुर्ननियुक्ती कामाच्या मुल्यांकणावर आधारीत असून २५ हजार रुपये आरोग्यवर्धीनी केंद्रावर रुजू झाल्यावर व १५ हजार कामावर आधारीत मोबदला त्यांना दिला जाणार आहे. तिन वर्षे दिलेल्या जिल्ह्यात सेवा न दिल्यास १ लाख ३ हजारांची वसुली करण्यात येईल. तर सीएचओचा कार्यालयीन वेळ सकाळी ८.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असेल. तसेच आपत्कालीन वेळेत कोणत्याही वेळी सीएचओंना हजर रहावे लागणार आहे. शिवाय खाजगी प्रॅक्टीस करता येणार नाही, असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
---
फोटो ओळः सीईओ डाॅ. मंगेश गोंदावले यांच्याहस्ते सीएचओंना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी डाॅ. सुधाकर शेळके, डाॅ. उल्हास गंडाळ, डाॅ. प्रदिप कुलकर्णी, डाॅ. विनायक मुंडे.