तयारीला लागा! मनोज जरांगेंनी जाहीर केला मराठा आरक्षण दिंडीचा मार्ग

By बापू सोळुंके | Published: December 28, 2023 02:24 PM2023-12-28T14:24:44+5:302023-12-28T14:25:29+5:30

लाखों समाजबांधवांसह मुंबईत धडकणार, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही

Community members get ready, Manoj Jarange announced the way to Maratha Reservation Dindi | तयारीला लागा! मनोज जरांगेंनी जाहीर केला मराठा आरक्षण दिंडीचा मार्ग

तयारीला लागा! मनोज जरांगेंनी जाहीर केला मराठा आरक्षण दिंडीचा मार्ग

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारी रोजी लाखो समाजबांधवांसह मुंबईला जाण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानुसार आज त्यांनी मुंबईला जाण्याचा रूट(मार्ग) त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. समाजबांधवांनी दररोज लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या साहित्यासह मराठा आरक्षण दिंडीत सहभागी होण्यासाठी तयारी सुरू करावी, असे आवाहन त्यांनी केले.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी  मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आंदोलन करीत आहेत. मराठा समाजाला टीकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यसरकारने दिलेली २४ डिसेंबरची मुदत संपल्याने मनोज जरांगे पाटील यांनी कोट्यवधी समाजबांधवासह मुंबईला जाण्याची घोषणा केली. गुरूवारी त्यांनी शहरातील खाजगी रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना मुंबईला जाण्याचा मार्ग कसा असेल, याविषयी सविस्तर माहिती दिली.

ते म्हणाले की, २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता अंतरवाली सराटी(जि. जालना)येथून मुंबईला जाण्याचा प्रवास सुरू होईल. तेथून शहागड, गेवराई (जि. बीड), पाडळसिंग, अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करून पाथर्डी, तीसगाव, करंजी फाटा मार्गे अहमदनगर, केडगाव, सूपा,शिरूर, शिक्रापूर मार्गे रांजणगाव मार्गे वाघोली, खराडी बायपास मार्गे, चंदननगर  पुणे, लोणावळा, पनवेल, वाशी ,चेम्बुर मार्गे मुंबईतील आझाद मैदान असा मार्ग असेल.

प्रवासाला किती दिवस लागतील, याप्रश्नाचे उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, आम्हाला काही विशिष्ट तारखेस मुंबईला पोहचायचे नाही, यामुळे कितीही दिवस लागले तरी आम्ही मुंबईत जाणारच आहोत. शिवाय प्रत्येक तुकडीच्या प्रमुखांनी आणि स्वयंसेवकांनी आपआपल्या तुकडीतील समाजबांधवाच्या जेवण, पाण्याची सोय करायची आहे. यासाठी एका वाहनातून मीठ,मिरची, तेल, ५० किलो बाजरी पीठ, ५० किलो गव्हाचे पीठ, ५० किलो तांदुळ, दाळी आणि छोटी चुल , पाण्याचे ड्रम, टँकर सोबत घ्यावी, जेथे रस्त्यात थांबाल तेथेच आपला स्वयंपाक करून खायचा आहे.

सुमारे सव्वादोन लाख स्वयंसेवक
कोट्यवधी समाजबांधव या मराठा आरक्षण पायी दिंडीत सहभागी होणार असल्याने कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी सुमारे दोन ते सव्वा दोन लाख स्वयंसेवक यासाठी तैनात असतील. विविध तुकड्यांमध्ये हा लाँगमार्च असेल. शिवाय मुंबईतील आणि राज्यातील मराठा बांधवांनी गट,तट सोडून या आंदोलनात सहभाग नोंदविण्याचे आवाहन यावेळी जरांगे पाटील यांनी केले.

Web Title: Community members get ready, Manoj Jarange announced the way to Maratha Reservation Dindi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.