औरंगाबाद शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी कंपनी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:31 AM2018-09-06T00:31:36+5:302018-09-06T11:36:04+5:30

शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकांकडून कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने बंगळुरू येथील कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

Company appointed to pick up entire garbage in Aurangabad city | औरंगाबाद शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी कंपनी नियुक्त

औरंगाबाद शहरातील संपूर्ण कचरा उचलण्यासाठी कंपनी नियुक्त

ठळक मुद्देमहिना अडीच कोटी खर्च : प्रत्येक घरातून कचरा जमा करणार

औरंगाबाद : शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकांकडून कचरा जमा करण्यासाठी महापालिकेने बंगळुरू येथील कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. एक टन कचरा उचलण्यासाठी १८७२ रुपये खर्च घेण्याचे कंपनीने महापालिकेला निविदा प्रक्रियेद्वारे कळविले आहे. वाटाघाटीत दर आणखी कमी होणार असले तरी मनपाला दरमहा या उपक्रमातून तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. बंगळुरू येथील कंपनीच्या कागदपत्रांची छाननी सुरू असून, लवकरच निविदा अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

शहरात दररोज ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. हा कचरा उचलण्यासाठी महापालिकेला दरवर्षी तब्बल ६५ ते ७० कोटी रुपये खर्च येत आहे. कचरा उचलण्यासाठी महापालिकेने ८० टक्के वाहने भाडेतत्त्वावर लावली आहेत. त्यामुळे अवाढव्य खर्च होत आहे. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी खर्च कमी करण्याच्या दृष्टीने शहरातील संपूर्ण कचरा उचलणे, नागरिकांकडून जमा करणे यासाठी खाजगी कंपनी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. तीन महिन्यांपासून निविदा प्रक्रिया सुरू होती. तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केल्यानंतर तीन कंपन्यांनी काम करण्याची इच्छाशक्ती दाखविली. त्यातील दोन कंपन्यांच्या निविदा उघडण्यात आल्या. बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीने सर्वात कमी दर भरले आहेत. १८७२ रुपयांमध्ये एक टन कचरा जमा करणे, प्रक्रिया केंद्रापर्यंत तो नेऊन पोहोचण्याची तयारी दर्शविली आहे. या दरानुसार कंपनीला ४५० मेट्रिक टन कचरा उचलण्यासाठी दररोज ८ लाख ४२ हजार रुपये मिळतील. महिना अडीच कोटी रुपये कंपनीला द्यावे लागणार आहेत. या उपक्रमामुळे महापालिकेचा ताण बराच कमी होणार आहे.

दररोज एक रुपया घेणार
बंगळुरू येथील कंपनी दररोज शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकांकडून कचरा जमा करणार आहे. नागरिकांनी कंपनीस दररोज एक रुपया द्यावा लागणार आहे. इंदूर महापालिका २ रुपये नागरिकांकडून जमा करीत आहे. एका मालमत्ताधारकाला महिना ३० रुपये द्यावे लागतील. या माध्यमातून महापालिकेला किमान १० कोटी रुपये वर्षाला मिळतील, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

हर्सूल येथे १५० मेट्रिक टनाचा प्रकल्प
हर्सूल येथे कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदा प्रक्रियेत कचºयावर कोणत्या तंत्रज्ञानाने प्रक्रिया करायची हे कंत्राटदारानेच ठरवावे, अशी मुभा देण्यात आली आहे. या निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने तिसºयांदा पुनर्निविदा काढण्यात आली आहे.

सीएनजी गॅससाठी पुनर्निविदा
कांचनवाडी येथे सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्यासाठी मनपाने निविदा प्रसिद्ध केली होती. ४ सप्टेंबरपर्यंत एकाही कंपनीने निविदा भरली नाही. मनपाने दुस-यांदा निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

छोट्या मशीन लवकरच सुरू होणार
रमानगर, पडेगाव, चिकलठाणा येथे १६ मेट्रिक टन क्षमतेच्या मशीन बसविण्याचे काम सुरू आहे. आठ दिवसांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच कचºयावर प्रक्रिया करण्याचे कामही सुरू होईल.

Web Title: Company appointed to pick up entire garbage in Aurangabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.