श्री इंजिनिअरिंगमध्ये कंपनी मालकाच्या भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:51 PM2019-02-24T23:51:09+5:302019-02-24T23:51:17+5:30
कंपनीच्या माजी कामगाराने मालकाच्या चुलत भावाचा लोखंडी फावडे डोक्यात घालून निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील श्री इंजिनिअरिंग कंपनीत घडली.
वाळूज महानगर : कंपनीच्या माजी कामगाराने मालकाच्या चुलत भावाचा लोखंडी फावडे डोक्यात घालून निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील श्री इंजिनिअरिंग कंपनीत घडली. जगदीश प्रल्हाद भराड, असे मृताचे नाव आहे, तर घटनेनंतर माजी कामगार सोमेश विधाटे हा फरार झाला आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील के-सेक्टरमध्ये दीपक भराड यांची श्री इंजिनिअरिंग कंपनी आहे. त्यांचा चुलत भाऊ जगदीश भराड हे याच कंपनीत कामाला असून, मोहन देवीदास अवचार या कामगारासह ते कंपनीतील एका खोलीत राहतात. जगदीश व मोहन हे शनिवारी रात्री खोलीत झोपले होते, तर सुपवायझर मुकेश साळुंके, विष्णू ढोके, सुरेश विधाटे आणि गोपाळ काळे हे काम करीत होते. दरम्यान, रात्री ११.३० वाजेच्या सुमारास कंपनीचा माजी कामगार सोमेश विधाटे (रा. शिरोडी खुर्द, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) हा कंपनीच्या गेटवरून उडी मारून आतमध्ये आला. तेव्हा साळुंके यांनी सोमेशला विचारणा केल्यानंतर तो परत कंपनीच्या गेटकडे गेला. त्याचवेळी कंपनीतील कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली. हा आवाज ऐकून खोलीतून बाहेर आलेल्या अवचारला सोमेश गेटजवळ उभा दिसला. अवचारने तात्काळ जगदीश यांना झोपेतून उठविले. या दोघांना पाहून सोमेशने गेटवरून उडी मारून सिएट रोडच्या दिशेने पळ काढला. मात्र, दोघांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्यास कंपनीत का आलास, याचा जाब सोमेशला विचारला. तेव्हा सोमेशने विधाटे याला भेटायला आल्याचे सांगितले. दरम्यान, जगदीश व सोमेश यांच्यात बाचाबाची सुरू असतानाच अवचारने सोमेशच्या पाठीवर प्लास्टिकची नळी मारली. सोमेशने बाजूलाच पडलेले लोखंडी फावडे मारण्यासाठी अवचारच्या अंगावर उगारला. मात्र, भीतीने त्याने तेथून पळ काढत स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. त्यानंतर सोमेशने जगदीश यांच्या डोक्यात फावडा घातला.
या मारहाणीमुळे जगदीश जमिनीवर कोसळले. खाली पडल्यानंतरही सोमेशने सहा-सात वेळा जगदीश यांना फावड्याने मारहाण केली. जगदीश रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर सोमेश तेथून पळून गेला. दरम्यान, गोपाळ काळे व सुरेश विधाटे यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी जगदीश भराड यांना कंपनीतील कामगारांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी जगदीश यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, सहायक पोलीस आयुक्त ज्ञानोबा मुंडे यांनी रविवारी सकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी गोपाळ काळे याच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमेश विधाटे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.