कंपनी म्हणते आधी जुने पैसे द्या, मगच रेमडेसिविर मागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:05 AM2021-05-09T04:05:27+5:302021-05-09T04:05:27+5:30
औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने कोरोनाची संभाव्य लाट लक्षात घेऊन दोन महिन्यांपूर्वी १० हजार रेमडेसिविर इंजेक्शनची खरेदी बंगळुरू येथील कंपनीकडून ...
औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने कोरोनाची संभाव्य लाट लक्षात घेऊन दोन महिन्यांपूर्वी १० हजार रेमडेसिविर इंजेक्शनची खरेदी बंगळुरू येथील कंपनीकडून केली. मात्र, प्रशासनाने आजपर्यंत कंपनीला बिल अदा केले नाही. त्यातच कंपनीला ६ हजार इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली. कंपनीनेही जुनी ५७ लाखांची थकबाकी जमा केल्याशिवाय नवीन इंजेक्शन मिळणार नाहीत, असे सांगितले. त्यामुळे महापालिकेची इंजेक्शन खरेदी संकटात सापडली आहे.
महापालिकेत रेमडेसिविर इंजेक्शन चोरी प्रकरण गाजत असतानाच प्रशासनाने आणखी १० हजार इंजेक्शनची ऑर्डर कंपनीला दिली. कंपनीने मागे अवघ्या ६०० रुपयांमध्ये दिलेल्या इंजेक्शनची किंमत १,४०० रुपये रुपये केली. महापालिकेने त्यास होकार दिला. कंपनीने नंतर जुनी थकबाकी भरल्याशिवाय इंजेक्शन देता येणार नाही, अशी भूमिका घेतली. सध्या कंपनीकडे स्टॉकही उपलब्ध नाही. महापालिकेने आता मंजूर निधीतून फक्त ६ हजार इंजेक्शनची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंजेक्शन नसले तरी आलबेल
महापालिकेकडे मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध असताना मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये दररोज ३०० इंजेक्शनचा वापर करण्यात येत होता. मागील काही दिवसांपासून मनपाकडे एकही इंजेक्शन शिल्लक नाही. रुग्णांना इंजेक्शन न देता बरे करण्यात येत आहे. मग रुग्णालयाने ६ हजार इंजेक्शनचा वापर चुकीच्या पद्धतीने केला का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. गरज नसताना ज्या रुग्णांना इंजेक्शन देण्यात आले, त्यांना नंतर साइड इफेक्ट होतील, त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.