कोरोनाच्या एकूण रुग्णांच्या तुलनेत
By | Published: December 3, 2020 04:08 AM2020-12-03T04:08:37+5:302020-12-03T04:08:37+5:30
बरे होण्याचा दर ९३ टक्के, एकूण रुग्ण ९४ लाखांवर नवी दिल्ली : देशभरात ३१,११८ नवीन रुग्ण ...
बरे होण्याचा दर ९३ टक्के, एकूण रुग्ण ९४ लाखांवर
नवी दिल्ली : देशभरात ३१,११८ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोना रुग्णाची संख्या ९४ लाख ६२ हजार ८०९ वर गेली आहे. दुसरीकडे, उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सलग २१ व्या दिवशी पाच लाखांपेक्षा कमी आहे. सध्या देशभरात ४,३५, ६०३ रुग्णांवर उपचार चालू असून एकूण संसर्गित रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण ४.६० टक्के आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार ८८,८९,५८५ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांत ४१,९८५ रुग्ण बरे झाले.
ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात मृतांची आणि नवीन रुग्णांच्या संख्येत ३० टक्के घट झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ९३.९४ टक्के असून मृत्यू होण्याचा दर १.४५ टक्के आहे.
गेल्या चोवीस तासांत आणखी ४८२ रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी दिल्लीत १०८, महाराष्ट्रात ८०, पश्चिम बंगाल ४८, हरयाणा २७ , पंजाब २७, छत्तीसगढ २१, केरळ २१ तसेच गुजरात २० आणि राजस्थानामध्ये २० रुग्ण दगावले. देशभरात आतापर्यंत १,३७ ६२१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात (४७,१५१) झाले आहेत. त्यानंतर कर्नाटकात ११,७७८, तामिळनाडूत ११,७१२, दिल्लीत ९१७४, प. बंगालमध्ये ८४२४, उत्तर प्रदेशात ७७६१, आंध्र प्रदेशात ६९९२, पंजाबमध्ये ४८०७ आणि गुजरातमध्ये ३९८९ व मध्यप्रदेशात ३२६० रुग्णांचा मृत्यू झाला.
देशभरात आतापर्यंत १४.१३ कोटी लोकांची कोरोना निदान चाचणी करण्यात आली आहे. संसर्ग होण्याचा दर ११ नोव्हेंबर रोजी ७.१५ टक्के होता, तो १ डिसेंबर रोजी ६.६९ टक्क्यांवर आला. दररोज सरासरी १०,५५,३८६ चाचण्या करण्यात आल्या. गेल्या सात दिवसांत १० लाख लोकसंख्येच्या तुलनेत २११ रुग्ण आढळले, तर दोन जणांचा मृत्यू झाला.