छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदासाठी शिंदेसेनेत स्पर्धा? शिरसाट, सत्तार की अजून कोणी
By विकास राऊत | Published: June 11, 2024 07:46 PM2024-06-11T19:46:24+5:302024-06-11T19:47:30+5:30
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, असा दावा सध्या सत्ताधारी करीत आहेत. विस्तार झाला तर आ. शिरसाट यांना मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी आशा आहे.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे हे खासदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना दोन्हींपैकी एकाच सभागृहाचे सदस्यत्व ठेवावे लागणार आहे. आमदारकीचा राजीनामा दिल्यावर त्यांचे रोहयो, फलोत्पादन खाते व पालकमंत्रिपदही रिक्त होणार आहे. त्या पदावर वर्णी लागावी, यासाठी शिंदेसेनेअंतर्गत जोरदार स्पर्धा लागली आहे.
सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार यांनी राजकीय हादरे बसतील, असे वक्तव्य करून दबावतंत्र वाढविण्यास सुरुवात केली आहे. तर भुमरे यांना पश्चिम मतदारसंघातून सर्वाधिक जास्त मताधिक्य देऊन आ. संजय शिरसाट हे मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळण्यासह पालकमंत्रिपदाचे दावेदार असल्याचे बोलले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, असा दावा सध्या सत्ताधारी करीत आहेत. विस्तार झाला तर आ. शिरसाट यांना मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी आशा आहे. त्यांना मागील दोन वर्षांत मंत्रिमंडळ समावेशाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर किमान साडेतीन महिने का होईना, परंतु आपल्याला संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. मंत्रिपद आणि पालकमंत्री अशी दोन्ही पदे त्यांना मिळतील काय, याबाबत साशंकता आहे. आ. शिरसाट यांना मंत्री करून नाराजी दूर केली जाईल, तर सत्तार यांना पालकमंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा शिंदेसेनेत आहे. साडेतीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आहेत, त्यामुळे स्पर्धा आणि वाद होण्यापेक्षा एखाद्या मंत्र्याकडे या जिल्ह्याचे प्रभारी पालकमंत्रिपदही दिले जाऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे.
निर्णय वरिष्ठ पातळीवर
पालकमंत्री तथा खा. संदीपान भुमरे म्हणाले, डीपीसीची एखादी बैठक घेता येईल, परंतु मला पालकमंत्रिपदी राहता येणार नाही. माझ्या जागेवर कुणाला संधी मिळेल, याबाबत मी काहीही सांगू शकत नाही. याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.