शालेय विद्यार्थ्यांसाठी २४ रोजी ‘पवनचक्की’ बनविण्याची स्पर्धा
By Admin | Published: August 3, 2014 01:00 AM2014-08-03T01:00:31+5:302014-08-03T01:11:01+5:30
औरंगाबाद : विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा
औरंगाबाद : विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, या उद्देशातून लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब व संडे सायन्स स्कूलच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २४ आॅगस्ट रोजी ‘विंडमिल मेकिंग स्पर्धे’ चे आयोजन करण्यात आले आहे.
डोंगरावर फिरणारी पवनचक्की बहुतांश जणांनी बघितली असेल. अशी पवनचक्की आपणसुद्धा तयार करावी, असा अनेकदा तुमच्या मनात विचार आलेला असेल. याच तुमच्या विचाराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कॅम्पस क्लबने पुढाकार घेतला आहे. पवनचक्की बनविणे हे कृतिशील विद्यार्थ्यांना संधीच नव्हे तर आव्हानही असणार आहे.
अक्षय ऊर्जादिनानिमित्त या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन गटांत ही स्पर्धा होणार आहे. पहिला गट इयत्ता ३ री ते ५ वी व दुसरा गट इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. स्पर्धा जालना रोडवरील लोकमत भवन येथे होणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वप्रथम नावनोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर एक कीट दिले जाणार आहे. ते स्पर्धकाला घरी नेता येईल. निवडक विद्यार्थ्यांना परीक्षकांसमोर प्रयोग सादरीकरणाची संधी मिळेल. या स्पर्धेत जिंकण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त एलईडी लाईट चालू करावे लागतील.
प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
नावनोंदणी करण्याची शेवटची तारीख १४ आॅगस्ट आहे, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी.
अधिक माहितीसाठी
अश्विनी चौधरी (८८८८८२६७६२-बीड बायपास ), शीतल लड्डा (८८८८८८९५०६ - वेदांतनगर) किंवा जया तसतोडे (९१५८०४१५०५- सिडको) यांच्याशी संपर्क साधावा.