धुराळा अन् मातीत ‘महसूल’च्या स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:31 AM2017-11-12T00:31:25+5:302017-11-12T00:31:33+5:30
क्रीडा संकुलाची केवळ नियोजनाअभावी दुरवस्था झाल्याने चक्क जिल्हाधिकारी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचा-यांना माती अन् धुराळ्यात स्पर्धा खेळाव्या लागल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा क्रीडा कार्यालयाचा कारभार महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धेमुळे चव्हाट्यावर आला आहे. ६० लाख रूपये खर्च केलेल्या क्रीडा संकुलाची केवळ नियोजनाअभावी दुरवस्था झाल्याने चक्क जिल्हाधिकारी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचा-यांना माती अन् धुराळ्यात स्पर्धा खेळाव्या लागल्या. विशेष म्हणजे आपला हा गलथान कारभाराबद्दल बोलणे बसू नयेत, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांनी शनिवारी कार्यालयाला दांडी मारली.
महसुल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेस शनिवारी जिल्हा क्रीडा संकुलात सुरूवात झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी एम.डी.सिंह यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटनही करण्यात आले. सर्व अधिकाºयांचे स्वागत आणि मनोगत व्यक्त करून झाल्यावर या स्पर्र्धांना मोठ्या थाटात सुरूवात झाली. परंतु क्रीडा संकुलाची अवस्था पाहून अनेक अधिका-यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. आगोदरच उन्हाचा कडाका आणि त्यात मातीत खेळावे लागत असल्याने अधिकारी, कर्मचारी असलेल्या खेळाडूंमधून क्रीडा कार्यालयाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आले. अनेकांनी ही नाराजी जाहीररित्या बोलूनही दाखविली.
डीएसओंकडून ‘नो रिस्पॉन्स’
जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे यांच्याशी याबाबत भ्रमणध्वणीवरून संपर्क केला. परंतु नेहमीप्रमाणे त्यांनी भ्रमणध्वणी घेतला नाही. त्यांनी ‘रिस्पॉन्स’ न दिल्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.