मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार; शिंदे गटाचे जंजाळ पोलीस ठाण्यात, पोलिसांसोबत उडाले खटके
By राम शिनगारे | Published: August 3, 2022 04:11 PM2022-08-03T16:11:05+5:302022-08-03T16:13:25+5:30
क्रांती चौक पोलिसांनी सभेचे आयोजक शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना चौकशीसाठी बोलवले होते.
औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी क्रांती चौकात रात्री १० वाजेच्यानंतर सभेस मार्गदर्शन केले. हे कायद्याचे उल्लंघन असून मुख्यमंत्र्यांसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या तक्रारी क्रांती चौक आणि वेदांत नगर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. या अनुषंगाने क्रांती चौक पोलिसांनी सभेचे आयोजक शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना चौकशीसाठी बोलवले होते. जंजाळ ठाण्यात आल्यानंतर त्यांचे पोलिसांसोबत खटके उडाल्याची माहिती आहे. दरम्यान, क्रांती चौक पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे अनेक समर्थक जमा झाला आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दोन दिवसीय दौरा पार पडला. दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांची क्रांती चौकात सभा झाली. मात्र यावेळी १० वाजेपासून ११ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्यात आला, मोठी गर्दीही जमली होती. हे कायद्याचे उल्लंघन असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या तक्रारी दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रांती चौक आणि वेदांत नगर पोलीस ठाण्यात केल्या आहेत. त्यावरून पोलिसांनी जंजाळ यांना बोलावून घेतले होते. यावेळी जंजाळ आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी बोलावून अपशब्द वापरल्याचा आरोप जंजाळ यांनी केल्या असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांची प्रकृती बिघडल्याने ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.
काय आहे प्रकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर रविवारी होते. त्यांनी क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात रात्री १०.१५ ते ११ वाजण्याच्या दरम्यान व्यासपीठावरून ध्वनिक्षेपकावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जमावही मोठ्या संख्येने उपस्थित होता. हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह आयोजकांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आनंद कस्तुरे यांनी क्रांतीचौक ठाण्याच्या प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली. दुसरी तक्रार वेदांतनगर ठाण्यात नोंदविण्यात आली. कोकणवाडी येथे रात्री ११.३० ते १२.३० वाजण्याच्या दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी आयोजकांनी फटाक्यांची आतषबाजी करून ध्वनिक्षेपक वाजविण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही तक्रार सामाजिक कार्यकर्ते मनोज वाहुळ यांनी नोंदवली.