तक्रार विनयभंगाची, पाचोड पोलिसांनी नोंदविली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:04 AM2021-04-02T04:04:26+5:302021-04-02T04:04:26+5:30
राजणगांव दांडगा (ता. पैठण) येथील विवाहितेच्या घरात आरोपी रियाज बादशाह पाईप नेण्याच्या बहाण्याने घुसला आणि त्याने महिलेसोबत गैरवर्तन केले. ...
राजणगांव दांडगा (ता. पैठण) येथील विवाहितेच्या घरात आरोपी रियाज बादशाह पाईप नेण्याच्या बहाण्याने घुसला आणि त्याने महिलेसोबत गैरवर्तन केले. महिलेने प्रतिकार करताच आरोपीने तिला मारहाण केली. आरोपी गावातील माजी सरपंच आहे. या घटनेनंतर पीडिता मुलासोबत पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथे हवालदार सुलाने यांनी आरोपीचे नाव लिहून घेतले. यानंतर त्यांनी कुणाला तरी फोन लावला. तक्रार लिहून न घेता आपल्यासह मुलाला शिवीगाळ केली आणि ठाण्यातून हाकलून लावले. यानंतर फिर्यादीच्या मुलाने थेट पोलीस अधीक्षकांना कॉल केल्यावर ठाणेदार सुरवसे ठाण्यात आले. त्यांच्या आदेशानुसार हवालदार कनिसे जबाब घेण्यास बसले. पीडितेच्या सांगण्यानुसार विनयभंगाची तक्रार न घेता मारहाणीची थातूरमातूर घटना त्यांनी नोंदवून घेतली. ही साधी तक्रार नोंदवून घेण्यास रात्रीचे ११:३० वाजले.
=======
चौकट
आरोपी खुर्चीवर तर फिर्यादीला बसवले जमिनीवर
रात्री आरोपी पोलीस ठाण्यात आल्यावर पोलिसांनी त्याला बसायला खुर्ची दिली, तर आम्हाला त्यांच्यासमोर जमिनीवर बसविल्याचे पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे. हा सर्व घटनाक्रम ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पीडितेने नमूद केले.
-===?======
ठाणेदार म्हणतात, तक्रारदाराला चांगली वागणूक दिली
पाचोड ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरवसे म्हणाले की, तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार जबाब नोंदविण्यास आमचे कर्मचारी बसले असताना त्यांनी अनेकदा जबाब बदलले. मारहाण झाल्याचे सुरुवातीला सांगितले. यामुळे गुन्हा नोंदविण्यात आला. त्यांच्या मुलासोबत हवालदाराचा शाब्दिक वाद झाला. मात्र, मारहाण करण्यात आली नाही. ठाण्यातील सीसीटीव्ही बंद असल्याचे त्यांनी सांगितले.