८२ थकबाकीदारांविरूद्धच्या तक्रारी प्रलंबित !

By Admin | Published: June 2, 2014 12:10 AM2014-06-02T00:10:39+5:302014-06-02T00:52:10+5:30

उस्मानाबाद : आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बड्या थकबाकीदाराविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.

Complaints against 82 defaulters pending! | ८२ थकबाकीदारांविरूद्धच्या तक्रारी प्रलंबित !

८२ थकबाकीदारांविरूद्धच्या तक्रारी प्रलंबित !

googlenewsNext

उस्मानाबाद : आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी बड्या थकबाकीदाराविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. ‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर टॉपटेन थकबाकीदाराविरुद्ध वेगवेगळ्या ठाण्यामध्ये तक्रारी दाखल केल्या. या तक्रारीचा आकडा ८२ वर जाऊन ठेपला आहे. या सर्व तक्रारी अद्यापही प्रलंबित आहेत. या थकबाकीदारांना कोणाचे अभय आहे? असा प्रश्न आता सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. शेतकरी, कष्टकरी आणि शेतमजुराची आर्थिक धमनी म्हणून ओळखल्या जाणारी डीसीसी बँक मागील काही महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. चलन तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेकांना त्यांच्या हक्काचेही पैसे मिळत नाहीत. याबाबत मोठ्या प्रमाणात ओरड झाल्यानंतर बँकेने टॉपटेन थकबाकीदाराविरुद्ध बीडच्या धर्तीवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याची अंमलबजावणी होण्यास उशीर लागला. काही पुढार्‍यांकडूनच या निर्णयाला विरोध होत होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त मालिका चालविल्यानंतर बँकेच्या कार्यकारी संचालकांनी संबंधित थकबाकीदारांना नोटिसा बजावल्या होत्या. विशेष म्हणजे कर्जाचा भरणा करण्यासाठी त्यांना डेडालाईनही देण्यात आली होती. मात्र या नोटिसांनाही थकबाकीदारांनी केराची टोपली दाखविली. त्यावर बँकेने कठोर पावले उचलत संबंधितांना अंतिम नोटीस सादर केली. असे असतानाही बहुतांश थकबाकीदारांनी थकित रक्कम भरण्याकडे कानाडोळा केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत बँकेने टॉपटेन थकबाकीदाराविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्या-त्या शाखेला दिले होते. त्यानुसार जिल्हाभरातील ८२ वर थकबाकीद यांच्या विरुद्ध संबंधित ठाण्यामध्ये तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र बँकेकडून ज्या गतीने तक्रारी नोंदविण्यात आल्या, त्या गतीने पोलिस ठाण्यांकडून संबंधितांवर गुन्हे दाखल झाले नाहीत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या तालुकाध्यक्षासह दोघा थकबाकीदाराविरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा पहिला गुन्हा आहे. आणखी ८२ तक्रारी गुन्हा दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे सर्व संबंधितांविरुद्ध तातडीने गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी आता ठेवीदार, खातेदार, शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे. (प्रतिनिधी) पथक कार्यान्वित शेती, बिगरशेतीचे वर्षानुवर्षाचे थकित कर्ज वसुल करण्यासाठी डीसीसीच्या मुख्यालयातील सात-आठ अधिकारी, कर्मचार्‍यांचे पथक तयार करण्यात आले आहे़ हे पथक गावो-गावच्या शाखेत जाऊन तेथील अधिकारी, कर्मचार्‍यांसह थकबाकीदारांकडे जावून कर्ज भरण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत़ जे कर्जाची परतफेड करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत, अशांवर गुन्हे दाखल व्हावेत, यासाठी संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचार्‍यांकडेही पाठपुरावा सुरू आहे़ कर्ज वसुलीसाठी मोहीम डीसीसी बँकेची शेती, बिगरशेतीचे जवळपास ७७१ कोटी रूपये थकबाकी आहे़ बँकेला गतवैभव प्राप्त करून देणयासाठी कर्जवसुलीची मोहीम जोरात राबविण्यात येत आहे़ संचालक मंडळाच्या बैठकीत कर्जवसुलीसाठी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ त्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेकांनी कर्जाचा भरणा केला आहे़ मात्र, कारवाईला न जुमानणार्‍यां ८३ जणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांमध्ये अर्ज देण्यात आले होते़ त्यातील पहिला गुन्हा हा लोहारा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे़ इतरांकडील कर्जवसुलीसाठी गुन्हे दाखल व्हावेत, यासाठी पाठपुरावा करण्यात येत असल्याचे प्रभावी व्यवस्थापक भुसारे यांनी सांगितले़

Web Title: Complaints against 82 defaulters pending!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.