सिडकोच्या लोकशाही दिनात तक्रारींचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 01:08 AM2017-07-18T01:08:13+5:302017-07-18T01:13:54+5:30
वाळूज महानगर : सिडकोतर्फे वाळूज महानगरमध्ये आयोजित लोकशाहीत दिनात नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : सिडकोतर्फे वाळूज महानगरमध्ये आयोजित लोकशाहीत दिनात नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला. या परिसरातील प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आदेश मुख्य प्रशासक ओम प्रकाश बकोरिया यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिले.
सिडको प्रशासनातर्फे सोमवारी (दि.१७) सिडकोच्या वाळूज महानगर कार्यालयात मुख्य प्रशासक ओम प्रकाश बकोरिया यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन घेण्यात आला.
सिडको वाळूज महानगरातील पाणीपुरवठा, ड्रेनेजलाइन, बांधकाम परवानगी, अंंतर्गत रस्ते, गतिरोधक, खुल्या जागा सामाजिक उपक्रमांसाठी देणे, उद्यान, स्टेडियमची उभारणी वेगात करा, भोगवटा प्रमाणपत्रासाठी नियमात बदल करणे, साफ-सफाई, सेवाकर व पाणीपट्टी आॅनलाइन वसूल करा, भाजी मंडई सुरू करणे, तीसगाव चौफुली ते गावापर्यंत रस्ता करा आदी तक्रारी नागरिकांनी केल्या.
नारायण हातोळे, दत्तात्रय वरपे, अंजन साळवे, राणूजी जाधव, नागेश कुठारे, विष्णू जाधव, प्रा. भरतसिंग सलामपुरे, नितीन चव्हाण, संतोष धुमाळ, यादव आदींनी तक्रारी केल्या. सिडको वाळूज महानगरात बांधलेले मोठमोठे बंगले रिकामे असून, त्यात रात्री गुन्हेगार आश्रय घेतात.
या बंगल्यांमुळे अस्वच्छताही वाढत असल्याचा आरोप करीत बंगल्याचा वापर न करणाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी नागरिकांनी केली.
बकोरिया यांनी समस्या त्वरित निकाली काढण्याचे आदेश दिले. या प्रसंगी सिडकोचे वरिष्ठ नियोजनकार एन. व्ही. गोलखंडे, कार्यकारी अभियंता नितीन कढरे, विकास अधिकारी पी. एम. चव्हाण, अतिक्रमण हटावचे गजानन साटोटे, सहायक कार्यकारी अभियंता जी. व्ही. ठाकूर, अभिजित पवार, आर. डी. मोरे, सुवर्णा मोरे, रवींद्र बारस्कर आदींची उपस्थिती होती.
या परिसरातील समस्या तात्काळ निकाली काढण्यासाठी आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्याच्या सूचना बकोरिया यांनी दिल्या.
बिल्डरांना काळ्या यादीत टाकणार
भोगवटा प्रमाणपत्र न घेता परस्पर घराची विक्री करून सुविधा न पुरविणाऱ्या बिल्डरांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश बकोरिया
यांनी दिले.