‘वॉर रुम’मध्ये तक्रारींचा पाऊस
By Admin | Published: May 2, 2016 11:52 PM2016-05-02T23:52:06+5:302016-05-03T00:02:03+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यात दुष्काळ व टंचाई निवारणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ‘वॉर रुम’ (नियंत्रण कक्ष) स्थापन केला आहे.
पाणी द्या : ७ दिवसांत १५५ तक्रारी; ग्रामीण भागातून २० तक्रारी दाखल...
लातूर : लातूर जिल्ह्यात दुष्काळ व टंचाई निवारणाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ‘वॉर रुम’ (नियंत्रण कक्ष) स्थापन केला आहे. गेल्या सात दिवसांत या कक्षात १५५ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यातील १३५ तक्रारी शहरातील असून, २० तक्रारी ग्रामीण भागातील आहेत. बहुतांश तक्रारी पाणीपुरवठा सुरळीत नसल्याच्याच आहेत.
लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे. रेल्वेने तसेच स्थानिक स्त्रोतांतून पाणीपुरवठा करण्यात येत असला, तरी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या अनेक तक्रारी नियंत्रण कक्षात गुदरल्या आहेत. २५ एप्रिल ते १ मे या सात दिवसांच्या कालावधीत एकूण १५५ तक्रारी आल्या आहेत. २५ एप्रिल रोजी २०, २६ रोजी ५०, २७ रोजी २१, २८ रोजी २०, २९ रोजी १५, ३० रोजी १४ आणि १ मे रोजी १५ अशा एकूण १५५ तक्रारी दाखल झाल्या. या तक्रारींवर स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून निवारण करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूण १४९ तक्रारींवर निर्णय घेण्यात आला आहे. केवळ ६ तक्रारी प्रलंबित आहेत. १५५ पैकी शहरी भागातील १३५ तक्रारी आहेत. या सर्व तक्रारी पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने होत्या. ग्रामीण भागातील २० तक्रारींपैकी १५ तक्रारी पाणीपुरवठा तर जनावरांना चारा नसल्याच्या संदर्भात तीन तक्रारी आहेत. अधिग्रहण व शेतकऱ्यांची प्रत्येकी एक तक्रार होती. या तक्रारींबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रुम २४ तास कार्यरत आहे. त्यासाठी ३ शिफ्टमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये नियमितपणे जनतेच्या मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्यात येत आहेत. २५ एप्रिल ते १ मे दरम्यान दूरध्वनी क्रमांकावरून १५५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी १४९ तक्रारी सोडविण्यात आल्या असल्याचे नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.
पाणी, चारा, रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार, अधिग्रहण, अन्नसुरक्षा आदींबाबत तक्रारी असल्यास थेट वॉर रुममधील टोल १ फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सूचित केले आहे. (प्रतिनिधी)
१४९ तक्रारींवर तोडगा : सहा तक्रारी प्रलंबित...
२५ एप्रिल ते १ मे या सात दिवसांच्या कालावधीत एकूण १५५ तक्रारी दूरध्वनी क्रमांक : ०२३८२-२२०२०४ तसेच व्हॉटस् अॅप नं. : ८४४६४५१०७७ वर या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील केवळ ६ तक्रारी प्रलंबित असून, १४९ तक्रारींवर निर्णय घेऊन तक्रारकर्त्यांना दिलासा देण्यात आला आहे. १५५ पैकी १३५ तक्रारी शहरी भागातील तर केवळ २० तक्रारी ग्रामीण भागातील आहेत. शहरी भागातील सर्वच तक्रारी पाणीपुरवठ्यासंदर्भात आहेत. ग्रामीण भागातील १५ तक्रारी पाणीपुरवठ्यावर होत्या.
तक्रारींचे निवारण...
जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली या तक्रारींवर वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीचे निराकरण करण्यात येत आहे. तक्रारींचे निराकरण झाल्यानंतर तक्रारदारांचे अभिप्रायही प्राप्त होत आहेत. या उपक्रमास नागरिकांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.
दूरध्वनी क्रमांक आणि व्हॉटस् अॅपचा नंबर तक्रारकर्त्यांसाठी २४ तास खुला असून, या दोन्ही क्रमांकावर तक्रार दिल्यास अगदी काही तासांमध्ये तक्रारींचे निराकरण करण्याचे प्रयत्न या कक्षातून केले जात आहेत.