ऑनलाइन वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:02 AM2021-03-20T04:02:16+5:302021-03-20T04:02:16+5:30
औरंगाबाद : ऑनलाइन वर्ग घेण्याच्या पूर्वीच सूचना दिलेल्या असतानादेखील अनेकजणांनी त्याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे विद्यापीठाने मुख्य परिसर व ...
औरंगाबाद : ऑनलाइन वर्ग घेण्याच्या पूर्वीच सूचना दिलेल्या असतानादेखील अनेकजणांनी त्याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे विद्यापीठाने मुख्य परिसर व उपपरिसरातील सर्व विभागप्रमुख व अधिव्याख्यात्यांना पुन्हा एकदा सूचित केले आहे की, ऑनलाइन प्रणालीचा वापर करून विद्यार्थ्यांचे वर्ग घ्या व ४ एप्रिलपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करा.
कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार नुकतेच सुरू झालेले विद्यापीठ व महाविद्यालयीन वर्ग बंद करावे लागले. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाइन वर्ग घेण्याचे पूर्वीच आदेश दिलेले आहेत; परंतु अनेक अधिव्याखाता ऑनलाइन वर्ग घेत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे पदव्युत्तर वर्गाच्या एप्रिलमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन
विद्यापीठाने केले आहे. तत्पूर्वी ४ एप्रिलपर्यंत ऑनलाइन वर्ग घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे
प्रशासनाने कळविले आहे.
५० टक्के कर्मचारी उपस्थिती अनिवार्य
राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे ५० टक्के कर्मचारी उपस्थितीबाबतची नियमावली जारी करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक व प्रशासकीय विभागाचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीसह चालू राहतील. सदर उपाययोजना ३१ मार्चपर्यंत अंमलात राहाणार असून या काळात विभागप्रमुखांनी त्यांच्या विभागातील अधिनस्थ एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहतील, याची दक्षता घ्यावी. तसेच ज्या विभागात एकच कर्मचारी कार्यरत आहे. अशा विभागप्रमुखांनी कामाच्या निकडीनुसार निर्णय घ्यावा.
चौकट.....
कर्मचारी- अधिकाऱ्यांची चलाखी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील ‘बायोमेट्रिक’ हजेरी बंद करण्यात आली आहे. त्याचा गैरफायदा घेत कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांसह अनेक विभाग व कार्यालयांतील नियमित कर्मचारी व अधिकारी वेळेचे बंधन पाळत नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. काहीजण दुपारनंतर कार्यालयात येतात, तर काही जण कार्यालयात येऊन मध्येच गायब होतात. काहीजणांचे कार्यालय रात्री उशिरापर्यंत चालले असते. कोणीही हालचाल रजिस्टवर नोंदी करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ
अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन वास्तव तपासण्याचा निर्णय घेतला आहे.