रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:55 PM2019-05-27T22:55:31+5:302019-05-27T22:56:08+5:30
फुलंब्री तालुक्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी केल्या. गरज असेल तेथे पाण्याचे स्रोत शोधून नव्याने प्रस्ताव तयार करा. मोठ्या गावांच्या योजनांसाठी थेट जायकवाडीतून पाणी आणण्याच्या दृष्टीने योजना आखण्याची सूचनाही त्यांनी केली. मतदारसंघातील पाणीपुरवठा योजना, खरीप हंगाम तयारी, शेतकरी मार्गदर्शन, रोजगार हमी कामांसंबंधीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी केल्या. गरज असेल तेथे पाण्याचे स्रोत शोधून नव्याने प्रस्ताव तयार करा. मोठ्या गावांच्या योजनांसाठी थेट जायकवाडीतून पाणी आणण्याच्या दृष्टीने योजना आखण्याची सूचनाही त्यांनी केली. मतदारसंघातील पाणीपुरवठा योजना, खरीप हंगाम तयारी, शेतकरी मार्गदर्शन, रोजगार हमी कामांसंबंधीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीला जिल्हाधिकारी उदय चौधरी, जि. प. सीईओ पवनीत कौर, उपजिल्हाधिकारी वर्षाराणी भोसले, बीडीओ एम. सी. राठोड यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. औरंगाबाद आणि फुलंब्री तालुक्यातील बहुतांश गावातील पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत. त्या योजना तातडीने पूर्ण करण्यात याव्यात. मान्सूनचे आगमन होत आहे. खरीप हंगामाची पूर्वतयारी कृषी विभागाने कशी केली आहे, बियाणे-खतांची आवश्यकता आणि उपलब्धता, संभाव्य किडींचा प्रादुर्भाव व इतर संकटे आणि त्यावरील उपाययोजनांविषयी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बागडे यांनी माहिती घेतली. रोजगार हमीच्या कामांची माहिती घेत मजुरांना वेळेवर काम उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही बागडे यांनी दिल्या. तसेच सावंगी आणि पिसादेवीसाठी चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतून पाणीपुरवठा योजनांचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.