चिकलठाणा विमानतळासमोर ‘औैरंगाबाद दर्शन’चे काम पूर्णत्वाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 16:55 IST2018-11-12T16:38:38+5:302018-11-12T16:55:27+5:30
पर्यटकांना औरंगाबाद शहरातील विविध पर्यटनस्थळांची माहिती व्हावी या उदात्त हेतूने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

चिकलठाणा विमानतळासमोर ‘औैरंगाबाद दर्शन’चे काम पूर्णत्वाकडे
औरंगाबाद : शहरात दाखल होणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना औरंगाबाद शहरातील विविध पर्यटनस्थळांची माहिती व्हावी या उदात्त हेतूने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. राज्य शासनाने या उपक्रमासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान दिले असून, एमटीडीसी आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने काम करण्यात येत आहे. पंधरा दिवसांत पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती बसविण्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर लवकरच लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येईल.
दरवर्षी अजिंठा-वेरूळला १५ ते १८ लाख देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. शहरात मकबरा पाहण्यासाठीही १२ ते १५ लाख पर्यटक येतात. दौलताबाद किल्लाही पर्यटकांना चांगलाच आकर्षित करतो. येथे ६ लाखांहून अधिक पर्यटक दरवर्षी येतात. औरंगाबाद शहराकडे पर्यटकांचा प्रचंड ओघ असताना त्यांना दर्जेदार सोयीसुविधा अजिबात मिळत नाहीत. मागील काही वर्षांत एमटीडीसीने प्रत्येक पर्यटनस्थळांवर किमान मूलभूत सोयीसुविधा मिळाव्यात यादृष्टीने छोटे-छोटे उपक्रम सुरू केले आहेत.
शहरात अनेक पर्यटक विमानाने येतात. विमानतळावर आल्यानंतर पर्यटकांना कुठे जावे, हे कळत नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यादृष्टीने विमानतळासमोर असलेल्या ११२ मीटर लांब आणि ९ मीटर रुंद जागेवर पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमासाठी राज्य शासनाने ५० लाख रुपयांचा निधीही एमटीडीसीला उपलब्ध करून दिला. तीन वर्षांपूर्वी हा निधी महापालिकेला देण्यात आला.
महापालिकेने निविदा काढण्यासाठी प्रचंड विलंब केला. कंत्राटदार निश्चित झाल्यानंतरही अनेक महिने कामच सुरू झाले नाही. अखेर सहा महिन्यांपूर्वी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाठपुरावा करून कामाला सुरुवात केली. मागील सहा महिन्यांपासून विविध पर्यटनस्थळांच्या प्रतिकृती तयार करण्यात येत होत्या. विमानतळासमोरील जागा स्वच्छ करून दोन्ही गेटच्या बाजूला अजिंठा येथील ‘पद्मपाणी’ची प्रतिकृती उभारण्यात आली. दुसऱ्या बाजूला वेरूळ येथील ‘कैलास स्तंभ’ उभारण्यात आला आहे. मध्यभागी सोनेरी महाल, औरंगाबाद लेणी, पाणचक्की, मकबरा, भडकलगेट, दिल्लीगेट, मकईगेटची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.
पंधरा दिवसांमध्ये काम पूर्ण होणार
मागील सहा महिन्यांपासून अथक परिश्रम घेऊन प्रतिकृती तयार करण्यात आल्या. औरंगाबाद दर्शनसाठी निवडण्यात आलेल्या जागेवर उद्यापासून लॉन बसविण्याचे काम सुरू होणार आहे. पंधरा दिवसांमध्ये काम संपेल, अशी अपेक्षा आहे.
-प्रदीप देशपांडे, वास्तुविशारद.