शेंद्रा जलवाहिनीचे काम पूर्णत्वाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 01:19 AM2018-07-18T01:19:50+5:302018-07-18T01:20:21+5:30
शेंद्रा आणि ‘डीएमआयसी’साठी जायकवाडीतून पाणी आणणाऱ्या स्वतंत्र जलवाहिनीचे काम पूर्णत्वाकडे आले. जलवाहिनीचे ५६ पैकी ५५ कि.मी. अंतराचे काम झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शेंद्रा आणि ‘डीएमआयसी’साठी जायकवाडीतून पाणी आणणाऱ्या स्वतंत्र जलवाहिनीचे काम पूर्णत्वाकडे आले. जलवाहिनीचे ५६ पैकी ५५ कि.मी. अंतराचे काम झाले आहे. परवानगीअभावी रेल्वेच्या हद्दीतील रेंगाळलेले जलवाहिनीचे उर्वरित कामही दीड महिन्यात मार्गी लागणार आहे. पाणी उपसा यंत्रणा कार्यान्वित होऊन डिसेंबरपासून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटी आॅटोमोबाईल, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी, अन्न व प्रक्रिया उद्योगांचे हब म्हणून पुढे येत आहे. याठिकाणी उद्योगांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम गतीने सुरू आहे. सुमारे ९०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून पायाभूत सुविधांचे ९५ टक्के काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
शेंद्रा, आॅरिक सिटीसह जालन्यातील औद्योगिक वसाहतींना जायकवाडीचे पाणी देण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली आहे. पैठण ते शेंद्रा हे अंतर जवळपास ७० कि.मी.चे आहे; परंतु ‘एमआयडीसी’च्या अधिका-यांनी जलवाहिनीसाठी हा मार्ग ५६ कि.मी.पर्यंत आणला. जायकवाडी, पैठण एमआयडीसी, वाहेगाव, हापूसवाडी, गेवराईवासी, खोडेगावमार्गे शेंद्रापर्यंत जलवाहिनी पोहोचली आहे. सध्या केवळ एक कि.मी. अंतराचे काम शिल्लक राहिले आहे. रेल्वे प्रशासनाच्या परवानगीअभावी काम रखडले होते.