‘एक विचार, एक मंच’चा परिसर फुलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:34 AM2018-01-15T00:34:52+5:302018-01-15T00:34:55+5:30
एक विचार, एक मंच’ हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार वर्धापन दिनाचे आकर्षण ठरले. एक मंचचा परिसर दुपारपासूनच आंबेडकरी समुदायाने दणाणून गेला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘एक विचार, एक मंच’ हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २४ व्या नामविस्तार वर्धापन दिनाचे आकर्षण ठरले. एक मंचचा परिसर दुपारपासूनच आंबेडकरी समुदायाने दणाणून गेला होता.
गटा-तटांमध्ये विखुरलेल्या आंबेडकरी समाजामध्ये कोरेगाव-भीमा येथील घटनेनंतर ऐक्याची भावना अधिक तीव्र झाली आहे. हे रविवारी ‘एक मंच’ला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादावरून स्पष्ट झाले. यासंदर्भात औरंगाबादेतील युवकांनी विद्यापीठ नामविस्तारदिनी एकच व्यासपीठ उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज गेट परिसरात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाचे व्यासपीठ सोडले, तर अन्य एकाही दलित पक्ष-संघटनेचे स्टेज दिसले नाही.
राज्याच्या कानाकोप-यातून लाखो आंबेडकरी अनुयायी विद्यापीठ गेट परिसरात आले होते. गेटसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व शहीद स्तंभास अभिवादन करण्यासाठी सकाळपासून रीघ लागली होती. विधि महाविद्यालयाकडून येणा-या रस्त्यावर तसेच आंबेडकर कला महाविद्यालयाचे मैदान व रस्त्यावर भीम-बुद्ध गीतांच्या कॅसेट, पुस्तके, फोटोंची दुकाने थाटलेली होती. भीमशक्तीच्या वतीने महाभोजनदान मंडप होता. हजारो आंबेडकरी अनुयायांनी सकाळपासूनच भोजनाचा आस्वाद घेतला. पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. यावेळी पहिल्यांदाच विद्यापीठ गेटकडे येणारे सर्व रस्ते पोलिसांनी सकाळपासून वाहनांसाठी बंद केले होते. समता सैनिक दलाच्या उत्कृष्ट संचलन व बंदोबस्ताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एक मंचावर दुपारपासून विविध गायक कलावंतांनी प्रबोधनात्मक गीते सादर केली. या मंचच्या स्वयंसेवकांनी उपस्थित जनसमुदायावर शिस्तबद्धपणे नियंत्रण मिळवले.