वैजापूरात कचऱ्यातून कंपोस्ट खतनिर्मितीवर भर; स्वच्छता सर्वेक्षणात मराठवाड्यात पटकावला दुसरा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 05:44 PM2019-03-04T17:44:25+5:302019-03-04T17:47:38+5:30
सर्वेक्षणात शहराने महाराष्ट्रात बारावा, तर मराठवाड्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
- मोबीन खान
वैजापूर (जि. औरंगाबाद) : कचऱ्याच्या प्रश्नामुळे स्मार्ट सिटी औरंगाबाद गेल्या वर्षभरापासून चर्चेत असतानाच जिल्ह्यातील वैजापूरने कचरामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. कचऱ्याच्या वर्गीकरणापासून ते कंपोस्ट खत निर्मितीपर्यंत नगरपालिकेने भर दिला आहे. वैजापूरकरांना लागलेल्या स्वच्छतेच्या वेडामुळे स्वच्छता सर्वेक्षणात शहराने महाराष्ट्रात बारावा, तर मराठवाड्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
४५ हजार लोकसंख्येच्या या वैजापूर शहरात ११ घंटागाड्या आणि ७७ कामगार कचरा उचलण्याचे काम करतात. लोकसंख्येच्या तुलनेत कामगारांचे प्रमाण कमीच पण, तरीही शहरातून ३.६ मेट्रिक टन कचरा संकलित होतो. यासाठी जीपीएस यंत्रणा लावण्यात आली. ज्यामुळे कचरा संकलनाला मदतच झाली. नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, मुख्याधिकारी विठ्ठल डाके, नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी केली. त्यामुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यात घट झाली. घरातील कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले. याचा परिपाक म्हणून ६ महिन्यांत ५५० टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात नगर परिषद यशस्वी ठरली.
खतविक्री शहरातील एकूण कचऱ्यापैकी
2.4 टन ओला कचरा कंपोस्ट खतनिर्मितीसाठी वापरला जातो. यासाठी येवला रोडवर 32 खड्डे तयार केलेले आहेत. तसेच पाला-पाचोळ्याचेही कंपोस्ट खत केले जात आहे. याचबरोबर विंड्रो कंपोस्टिंगचाही प्रयोग केला जात आहे. इथे तयार होणाऱ्या खताची विक्री पालिकेने आता सुरू केली आहे. सुक्या कचऱ्यातही काच, प्लास्टिक, लोखंडाच्या वस्तू गोळा करून नेण्याचे काम कचरा वेचक महिलांकडून होते. प्लास्टिक पिशव्या वेगळ्या करून त्या कंपनीस पाच रुपये प्रतिकिलो दराने विकल्या जात आहेत.
प्रशासकीय, राजकीय इच्छाशक्ती
जिल्ह्याबाहेर फारसे परिचित नसलेले वैजापूर २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्वच्छता सर्वेक्षणात देशात २३ व्या स्थानी, तर राज्यात १२ व्या आणि मराठवाड्यातून दुसऱ्या क्रमांकावर आले. शहराच्या विकासासाठी आवश्यक प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीने नागरिकांच्या मदतीने वैजापूरला हे यश मिळवून दिले.
शहरातील कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या कंपोस्ट खताचे मार्केटिंग व प्रत्यक्ष विक्री करण्यासाठी ‘हरित कंपोस्ट खत’ हा ब्रँड वापरण्यास राज्य शासनाने वैजापूर नगर परिषदेस परवानगी दिली आहे. राज्यातील मोजक्या नगरपालिकांना ही परवानगी मिळाली असून त्यात येथील पालिकेचा समावेश आहे. डंपिंगग्राऊं ड हद्दपार करीत मोजक्या मनुष्यबळाच्या जोरावर नगर परिषदेने ‘तीन स्टार’ मिळवत स्वच्छतेत शहराचा ठसा उमटविला आहे.