ST Strike : मराठवाड्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:59 PM2018-06-08T12:59:48+5:302018-06-08T13:06:16+5:30
विविध प्रलंबित मागण्यांसाठी काल मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
औरंगाबाद : विविध प्रलंबित मागण्यांसाठी काल मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अघोषित संपाला मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद, नांदेड या आगारात नियमित बस फेऱ्या सुरु आहेत.तर कन्नड, गेवराई, हिंगोली, पाटोदा, परळी आदी आगारात कर्मचारी संपात सहभागी आहेत.
राज्य परिवहन विभागाने कर्मचाऱ्यांना दिलेली पगारवाढ फसवी आहे. केवळ आकडेमोड करून कर्मचाऱ्यांना वाढ देत असल्याने प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना विशेष फायदा होत नसल्याचा आरोप कामगार संघटनेने करून काम बंद आंदोलन पुकारले आहे. मध्यरात्रीपासूनच अनेक आगारात संपाचा परिणाम दिसून आला. मराठवाड्यात औरंगाबाद व नांदेड आगारात बससेवा सुरळीत असून आतापर्यंतच्या सर्व गाड्या रवाना झाल्या असल्याची माहिती आगारातून मिळाली आहे. तर भोकर येथे दोन बसवर दगडफेकीची घटना वगळता संप शांततेत सुरु आहे.
हिंगोली :
बसचालक वाहक संपात सहभागी झाल्याने सकाळपासून बससेवा बंद. काही चालक वाहकांच्या इच्छेनुसार बस सोडण्यात आल्या. बससेवा बंदमुळे प्रवासी स्थानकात ताटकळले.
उमरी :
भोकर - उमरी - नरसी बस सेवा चालू आहे . सकाळपासून नरसीला ३ गाड्या प्रवासी घेऊन उमरी मार्गे गेल्या व परत भोकरला पण गेल्या. एसटी कर्मचा-यांच्या संपाचा परिणाम नाही.
कन्नड :
बस आगारातुन सकाळपासुन आतापर्यंत ७ बस प्रवाशी घेऊन बाहेर पडल्या.बहुतांशी कर्मचारी,वाहक -चालक संपात सहभागी झाले आहेत
परळी :
संपूर्ण बस वाहतूक ठप्प असून प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत आहेत. सर्व कर्मचारी आगाराच्या प्रवेशद्वारावर बसून आहेत.
पाटोदा :
महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेने काम बंद आंदोलन पुकारल्याने येथील बस अगाराचा कारभार विस्कळित झाला. शिव सेना संबंधित संघटनेचे केवळ चार कर्मचारी कर्तव्यावर आहेत. दोन बस ग्रामीण भागासाठी स्थानकाबाहेर गेल्याचे आगारप्रमुख एस बी पडवळ यांनी सांगितले .
गेवराई :
संपामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल झाले असुन अनेक प्रवासी आगारात ताटकळत बसले आहेत. आगारात बसेसच्या रांगा लागल्या आहेत
खाजगी वाहतुकीचे तिकीट दर वाढले
संपामुळे अनेक प्रवाश्यांनी खाजगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय निवडला. मात्र खाजगी प्रवासी वाहकांनी तिकीट दर दुप्पट केले आहेत. वाहतुक करणा-या रिक्षा, जीप यांनी गेवराई ते बीड 40 रूपये असताना आज मात्र 100 रूपये घेत होते तर औरंगाबाद चे भाडे 100 येवजी 200 आकारले जात आहेत.