चित्रपटातून प्रेरणा घेऊन कचऱ्यापासून कंपोस्ट खतनिर्मितीचा ध्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 05:52 PM2019-04-21T17:52:19+5:302019-04-21T17:55:22+5:30
आपला कचरा, आपली जबाबदारी!
- अबोली कुलकर्णी
औरंगाबाद : घरात गोळा होणाऱ्या कचऱ्याचे काय करायचे? हा प्रश्न गृहिणींना रोजच पडतो. मग हा कचरा एकतर रस्त्यावर किंवा उकिरड्यावर नेऊन टाकला जातो, नाहीतर ओला-सुका, असे त्याचे वर्गीकरण करून कचरापेट्यांमध्ये त्या टाकतात. मात्र, या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करू शकतो, हा विचारच डोक्यात येत नाही. मात्र, गेल्या ५ वर्षांपासून कॅनॉट परिसरातील एक जागरूक नागरिक स्वाती स्मार्त या घरच्या घरी कंपोस्ट खतनिर्मिती करतात. ‘आपला कचरा, आपली जबाबदारी’ या एकाच ध्यासाने त्या कार्यरत आहेत.
गत ५ वर्षांपूर्वी स्वाती स्मार्त यांनी ‘वसुंधरा फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दाखविण्यात आलेल्या चित्रपटांमधून कचऱ्याचे योग्य संकलन करून त्यापासून खतनिर्मितीचे वेगवेगळे प्रयोग पाहिले. यापासून प्रेरणा घेत त्यांनी घरच्या घरी ओला कचरा एकत्र करून खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली. ‘स्मार्ट कम्पोस्टिंग ड्रम’च्या माध्यमातून त्या घरच्या घरी खत बनवतात. कंपोस्ट खतनिर्मितीबाबत त्या कन्नड, बीड, औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तेथील महिलांशी संवाद साधत जागरूकता करतात. त्यांनी आतापर्यंत १०० पेक्षा अधिक प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत.
घरच्या घरी अशी करावी कंपोस्ट खतनिर्मिती साधा पाण्याचा माठ, मोठ्या ड्रमपासून सुरुवात करावी. ड्रमला छिदे्र पाडून खाली मातीचा बेस तयार करून घ्यावा. त्यावर पाणी शिंपडून सर्व ओला कचरा पसरवून टाकावा. ओला कचरा म्हणजे भाज्या, फळांच्या साली, देठ, चहाचा चोथा, उरलेले अन्न, खरकटे, कुंड्यांमधला कचरा, निर्माल्य, असे सर्व पसरवून टाकावे. साधारणपणे ५, ६ इंच ओल्या कचऱ्यावर २ इंच मातीचा थर पसरवावा, असे दररोज करावे. यास खालीपर्यंत हवा (आॅक्सिजन) मिळावी म्हणून ८-१० दिवसांनी काठीने थोडे-थोडे हलवावे. साधारणपणे ३-४ महिन्यांत खत तयार होते. नंतर हे खत आपण झाडांना वापरू शकतो. नर्सरीतही देऊ शकतो किंवा हेच खत ओल्या कचऱ्यावर मातीसारखे टाकू शकतो. हेच खत आणि थोडी माती टाकून सिमेंटच्या पोत्यात भरल्यास यात पालेभाज्या, मिरची, इतर वेली, भाज्या लावता येतात. गच्चीवर तर सुंदर बाग करता येते. खत तयार करायची घाई असेल, तर ओल्या कचऱ्यावर चिमूटभर बायो कल्चर टाकले; अथवा आंबट ताक शिंपडले तरी चालते. यात फार पाणी राहू देऊ नये. नाहीतर हवा मिळत नाही. मिश्रण सडले तर वास येऊ शकतो. या प्रक्रियेत फक्त कुजणे अपेक्षित आहे.
उत्तम पर्याय
स्वाती स्मार्त म्हणाल्या, ‘अनेक नागरिकांची तक्रार असते की, आम्हाला खतनिर्मितीची आवड तर आहे; पण आमच्याकडे जागाच नाही. अशा नागरिकांसाठी एक उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही ड्रम, पाण्याची बादली, जुने माठ यांच्यामध्येही ही खतनिर्मितीची प्रक्रिया करू शकता. या प्रकल्पाला जास्त जागाही लागत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्येही हा प्रकल्प करू शकता, जेणेकरून हवाही खेळती राहील आणि वासही येणार नाही.’