व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेशी तडजोड ? १४ लाखांचे वर्षभरापासून रुग्णसेवेत, पण २.१६ लाखांचे पहिल्याच दिवशी नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 03:30 PM2021-05-19T15:30:51+5:302021-05-19T15:32:48+5:30
रुग्णांच्या जीवितास धोका असल्याचा घाटी रुग्णालयाचा खुलासा
औरंगाबाद : केंद्र आणि राज्य सरकारच्या साहाय्याने घाटीत उभारण्यात आलेल्या सुपर स्पेशालिटी ब्लाॅकसाठी प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेतून प्रत्येकी १४ लाखांचे ३५ व्हेंटिलेटर मिळाले आहेत. हे व्हेंटिलेटर वर्षभरापासून कोरोना रुग्णांच्या उपचारात अविरतपणे काम करीत आहेत. परंतु महिनाभरापूर्वी पीएम केअर फंडातून आलेले प्रत्येकी २.१६ लाखाचे व्हेंटिलेटर पहिल्याच दिवशी नादुरुस्त असल्याचे उघड झाले. त्यामुळे कमी रकमेत व्हेंटिलेटर देण्याच्या प्रयत्नात गुणवत्तेशी तडजोड करण्यात आल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
घाटीत हृदयरोग, मेंदूविकार, मूत्रपिंड विकारासह आदींवर सुपर स्पेशालिटी उपचार मिळण्यासाठी भव्यदिव्य सुपर स्पेशालिटी ब्लाॅकची इमारत उभी राहिली. याठिकाणी सुपर स्पेशालिटी उपचारासाठी अनेक प्रकारची यंत्रसामग्री दाखल झाली. त्यात व्हेंटिलेटरचाही समावेश आहे. जवळपास १४ लाख रुपये किमत असलेले ३५ व्हेंटिलेटर मिळाले. परंतु सुपर स्पेशालिटीत उपचार सुरू होण्यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि या इमारतीत गेल्या वर्षभरापासून काेरोना रुग्णांवर उपचार होत आहेत. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेतून (पीएमएसएसवाय) मिळालेले ३५ व्हेंटिलेटर वर्षभरापासून अखंडपणे सुरु असल्याचे सांगण्यात आले. त्याच वेळी महिनाभरापूर्वी पीएम केअर फंडातून मिळालेल्या व्हेंटिलेटर पहिल्या दिवसापासून रुग्णांसाठी निरुपयोगी ठरत आहे.
घाटीचा खुलासा आला समोर...जोखीम घेऊन रुग्णांना वापरणे योग्य नाही
व्हेंटिलेटरप्रकरणी घाटीने केलेला खुलासा मंगळवारी समोर आला. घाटीला १२ एप्रिल रोजी १०० व्हेंटिलेटर मिळाले. याच एक दिवशी व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यात आले, तेव्हा ते डेडिकेट कोविड केअर हाॅस्पिटलमध्ये दाखल अतिगंभीर रुग्णांसाठी वापरायोग्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १८ एप्रिल रोजी २५ व्हेंटिलेटर कंपनीच्या इंजिनिअर्सनी कार्यान्वित करून दिले. परंतु दुसऱ्याच दिवशी १९ एप्रिलपासून हे व्हेंटिलेटर रुग्णसेवेतून परत येऊ लागले. २० एप्रिल रोजी सर्व २५ व्हेंटिलेटर परत आले. ऑक्सिजन पुरवठा योग्य प्रमाणात न होणे, ऑक्सिजनची पातळी कमी होणे अशा तक्रार समोर आल्या. रुग्णाच्या जीवितास धोका होता, जोखीम घेऊन रुग्णांना वापरणे योग्य नव्हते, त्यामुळे ज्योती सीएनसी कंपनीचे धमन-३ व्हेंटिलेटर तातडीने वाॅर्डातून बाहेर काढण्यात आल्याचे या खुलाशात नमूद करण्यात आले आहे.
...तरीही व्हेंटिलेटरचे वाटप
१२ एप्रिल रोजी घाटीने सदर व्हेंटिलेटर अतिगंभीर रुग्णांना वापरता येणारे नसल्याचे सांगितले. साधारण गंभीर रुग्णांना वापरता येऊ शकते, असे घाटीने नमूद केले. याच दिवशी यासंदर्भात जिल्हाधिकांना इन्स्पेक्शन रिपोर्ट सादर करण्यात आला. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी २३ एप्रिल रोजी ५५ व्हेंटिलेटर हे हिंगोली, बीड, उस्मानाबाद, परभणीला वितरीत करण्याचे आदेश दिले. तर जिल्हाधिकाऱ्यांनी २७ एप्रिल, १ मे आणि १० मे रोजी शहरातील ५ खासगी रुग्णालयांना उसनवारी तत्त्वावर सदर व्हेंटिलेटर वितरित करण्याचे आदेश दिले. घाटी जर हे व्हेंटिलेटर वापरणे रुग्णाच्या जिवितास धोका म्हणत असेल तर मग त्यानंतरही का वाटप करण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
५८ व्हेंटिलेटर नादुरुस्त, ३७ व्हेंटिलेटर पडून
१५० व्हेंटिलेटरपैकी ५८ व्हेंटिलेटर नादुरुस्त असल्याने उपयोगात आले नाही. तर ३७ व्हेंटिलेटर पडून आहेत. ते कार्यान्वित करण्याची कार्यवाही केली नाही. उर्वरित ५५ व्हेंटिलेटर इतर ४ जिल्ह्यांना देण्यात आले आहेत.
ऑडिटसाठी कोणी आले नाही
घाटीत आजपर्यंत शासनातर्फे कोणतीही समिती, ऑडिटसाठी पथक आलेले नाही. व्हेंटिलेटरची चौकशी, तपासणी करण्यासाठी शासनाकडून नेमके कोण येतात, त्यातून काय समोर येते, कोणावर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. व्हेंटिलेटरच्या संपूर्ण स्थितीवर आता घाटी प्रशासनाकडून बोलण्याचे टाळले जात आहे.
व्हेंटिलेटर दिल्याची लपवालपवी
गेली काही दिवस ४ रुग्णालयांना ३१ व्हेंटिलेटर दिल्याचे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. परंतु मेडिकव्हर हाॅस्पिटलला १० मे रोजी १० व्हेंटिलेटर देण्यात आल्याचे समोर आले आहे. तब्बल ४१ व्हेंटिलेटर हे खासगी रुग्णालयांना देण्यात आले. घाटीला हे व्हेंटिलेटर चालू शकले नाही, तरीही खासगी रुग्णालयांना व्हेंटिलेटर देण्यात आले.
३ कोटी ६२ लाखांचे १५० व्हेंटिलेटर
पीएम केअर फंडातून आलेल्या १५० व्हेंटिलेटरची एकूण किंमत ३ कोटी ६२ लाख ८८ हजार रुपये इतकी आहे. एका व्हेंटिलेटरची किमत २ लाख १६ हजार रुपये इतकी आहे.