संगणक केंद्राचे ‘शट डाऊन’, संचालक झाले बेरोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:04 AM2021-04-25T04:04:46+5:302021-04-25T04:04:46+5:30
गंगापूर : कोरोनाने अनेक उद्योगधंद्यांना आपल्या विळख्यात घेतले आहे. संगणक साक्षर करून अनेकांना रोजगार देणारे संगणक केंद्र सलग दुसऱ्या ...
गंगापूर : कोरोनाने अनेक उद्योगधंद्यांना आपल्या विळख्यात घेतले आहे. संगणक साक्षर करून अनेकांना रोजगार देणारे संगणक केंद्र सलग दुसऱ्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळेदेखील ओस पडल्याने केंद्र चालक व संगणक प्रशिक्षकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे, तर अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्व सरकारी, निमसरकारी व खासगी आस्थापनांचा व्यवहार संगणकाशिवाय पूर्णच होत नाही. संगणक साक्षर असणे काळाची गरज आहे. मुलांना विद्यार्थिदशेपासूनच संगणकाची माहिती असावी यासाठी अनेक शाळांमध्ये त्यांना संगणकाची प्राथमिक माहिती दिली जाते, तर संगणक साक्षर होण्यासाठी अनेक विद्यार्थी वार्षिक परीक्षा संपल्यावर उन्हाळ्यात एमएससीआयटीला प्रवेश घेतात. परंतु, गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नाही. २०२०च्या फेब्रुवारीमध्ये जाहिरातीसाठी केलेला खर्चदेखील वाया गेल्याने केंद्र चालकांचे आर्थिक नुकसान झाले.
तालुक्यातील ३० केंद्रचालकावर उपासमार
सलग दुसऱ्या वर्षीही लॉकडाऊन आल्याने उत्पन्न बुडाल्यामुळे तालुक्यातील गंगापूर, लासूर, वाहेगाव, कायगाव, वाळूज, रांजणगाव, आंबेलोहळ, ढोरेगाव, आसेगाव, शेंदूरवादा व सावखेडा येथील एमकेसीएलचे २४ व इतर ६ मिळून एकूण ३० संगणक केंद्रचालक व प्रशिक्षकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. त्यामुळे ते संकटात सापडले आहेत.
७० टक्के विद्यार्थी प्रशिक्षणाला मुखले
सन २०१९ मध्ये तालुक्यात ६,१९९ विद्यार्थी संगणक साक्षर झाले होते, तर २०२० मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत केंद्र चालू राहिल्याने केवळ दोन हजार विद्यार्थी प्रवेश घेऊ शकले. यातल्या २० टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन संगणक प्रशिक्षण पूर्ण केले. म्हणजे २०२० मध्ये साधारणपणे ७० टक्के विद्यार्थी संगणक प्रशिक्षणापासून वंचित राहिले.
यंदाही कडक लॉकडाऊन सुरू असल्याने संगणक संच धूळ खात पडले आहेत. केंद्र चालक व त्यांच्या केंद्रातील प्रशिक्षकांचा रोजगार बुडाला आहे, तर अनेक विद्यार्थ्यांना संगणक साक्षर होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोट
सलग दुसऱ्या वर्षीच्या ऐन उन्हाळ्यात लॉकडाऊनमुळे प्रवेश प्रक्रिया रद्द झाली. त्यामुळे नुकसान झाले आहे. आमच्याकडील प्रशिक्षक बेरोजगार झाले असून, जाहिरातीचा खर्चदेखील वाया गेला आहे.
- योगेश धोत्रे, एमकेसीएल, गंगापूर तालुका समन्वयक
केंद्र जरी बंद असले तरी संगणकांची सातत्याने देखभाल करावी लागत असल्याने भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास संगणक संच विक्रीशिवाय पर्याय राहणार नाही. - अतुल कुलकर्णी, संगणक केंद्र संचालक