बनावट ग्राहकांच्या तक्रारी पाठवून संगणक कंपनीची लाखोंची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 04:16 PM2019-06-10T16:16:03+5:302019-06-10T16:19:25+5:30
कंपनीने पाठविलेले लॅपटॉपचे सुटे भाग परस्पर विकले
औरंगाबाद : नामांकित कंपनीचे संगणक आणि लॅपटॉप दुरुस्तीचे करारपद्धतीने काम करणाऱ्या एका एजन्सीचालकाने कंपनीला चक्क बनावट तक्रारदार पाठवून कंपनीकडून लाखो रुपयांचे सुटे भाग मागविले. त्या सुट्या भागांची परस्पर विक्री करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी कंपनीचा विश्वासघात करणाऱ्यासह त्याच्याकडून सुटे भाग खरेदी करणाऱ्याविरोधात सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
आकाश दिलीप डाके (२३, ह.मु. उस्मानपुरा, मूळ रा. हदगाव, ता. पैठण), विकास सिंग आणि सॅम करण अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. सिडको पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार माधव निवृत्ती काळे (रा. शिवाजीनगर, पुणे) यांची पुणे येथे इम्पॅक्ट इन्फोटेक प्रा. लि. कंपनी आहे. या कंपनीकडून नामांकित कंपनीचे संगणक आणि लॅपटॉप दुरुस्तीचे काम चालते. कंपनीचे सिडकोतील कॅनॉट प्लेस येथे शाखा कार्यालय आहे. कंपनीने औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील ग्राहकांच्या तक्रारीनुसार संगणक दुरुस्ती करण्याचे काम आकाश डाके याला दिले. याबाबतचा करार त्यांनी आकाश डाकेसोबत केला. ग्राहकांच्या तक्रारी कंपनीला प्राप्त झाल्यानंतर त्या ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करणे, वॉरंटी कालावधीत सेवा देण्याचे काम डाकेकडे होेते. हे काम डाके हा कॅनॉट येथील कंपनीच्या कार्यालयात बसून करीत असे. यामुळे कॅनॉटमधील कार्यालयाची चावीही त्याच्याकडे होती.
एप्रिल महिन्यात डाकेने ग्राहकांच्या तक्रारी निवारण केल्यानंतर वापरलेले सुटे भाग कंपनीला परत केले नाही. यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्या व्यवस्थापकाला औरंगाबादला पाठविले. तेव्हा कंपनीच्या कार्यालयात काही वापरलेले सुटे भाग पडलेले दिसले तर काही सुटे भागाचे खोके रिकामे दिसले. त्यानंतर त्याने कॉल लॉग बुकमध्ये नोंद केलेल्या ग्राहकांचा शोध घेतला असता त्यांच्या पत्त्यावर ते राहत नसल्याचे आणि त्यांनी दिलेले मोबाईल नंबरही अस्तित्वात नसल्याचे समोर आले. डाके याने निवारण केलेल्या एप्रिल आणि मे महिन्यात तब्बल ३८५ तक्रारी अशाच असल्याचे निदर्शनास आले.
चौकशीनंतर दिली गुन्ह्याची कबुली
याविषयी कंपनीने आकाश डाकेची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत विकास सिंग आणि सॅम करण यांनी काही दिवसांपूर्वी त्याच्यासोबत संपर्क साधून त्यांनीच आपल्याकडून ओरिजनल स्पेअरपार्ट विकत घेतल्याचे सांगितले.