छत्रपती संभाजीनगरच्या चळवळीशी कॉम्रेड सीताराम येचुरींचं घट्टं नातं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 02:56 PM2024-09-13T14:56:04+5:302024-09-13T14:56:44+5:30

भारतातील तरुणांना कम्युनिस्ट चळवळीचे आकर्षण ज्यांच्यामुळे निर्माण झाले, त्यापैकी एक कॉ. सीताराम येचुरी यांचे व्यक्तिमत्त्व होते.

Comrade Sitaram Yechury's close relationship with the movement of Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरच्या चळवळीशी कॉम्रेड सीताराम येचुरींचं घट्टं नातं

छत्रपती संभाजीनगरच्या चळवळीशी कॉम्रेड सीताराम येचुरींचं घट्टं नातं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या चळवळीशी कॉ. सीताराम येचुरी यांचं घट्ट नातं होतं. १ ऑक्टोबर २०२३ रोजी अजबनगरातील सीटू भवनात कॉ. येचुरी आले होते. त्यांची पत्रपिरषद झाली होती. त्यानंतर ते बीडकडे रवाना झाले होते. परळीजवळील शिरसाळा येथे त्यांच्या हस्ते कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते. १९९८ साली कॉ. येचुरींच्या हस्ते सीटू भवनाच्या वरच्या मजल्याचं उद्घाटन झालं होतं. कोरोना काळात त्यांचं छत्रपती संभाजीनगरला येणं - जाणं थांबलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांची अनेक व्याख्यानं झाली होती.

कॉ. सीताराम येचुरी यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे तरुणाई आकर्षित होत असे. त्यांचा प्रभावी आवाज... आणि मार्क्सवादाचा मोठा व्यासंग अनुभवण्यासारखा होता. त्यांच्या निधनामुळे छत्रपती संभाजीनगरातील डाव्या व परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते हळहळ व्यक्त करीत आहेत.

माकपतर्फे श्रद्धांजली
देशभरातील पक्षसभासद व हितचिंतकांत कॉ. सीताराम येचुरी यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा माकपतर्फे कॉ. भगवान भोजने, लक्ष्मण साक्रुडकर, श्रीकांत फोपसे, सेलवम डॅनियल, भाऊसाहेब झिरपे, प्रकाश पाटील, सचिन गंडले, रखमाजी कांबळे, सुनील राठोड, सतीश कुलकर्णी, चैताली पॉल, बाबासाहेब वावळकर, अजय भवलकर, कॉ. सुलभा मुंडे, कॉ. मंगल ठोंबरे आदींनी शोक व्यक्त केला.

लढाऊ नेते हरपले....
कॉ. सीताराम येचुरी हे राष्ट्रीय राजकारणात वैचारिक, प्रगतिशील आणि संतुलित भूमिका घेणारे लढाऊ नेते होते. गोरगरीब व कष्टकरी वर्गाच्या बाजूने त्यांनी राजकारण केले. सार्वजनिक जीवनात विचारांची बांधीलकी कायम ठेवणारे ते एक ज्येष्ठ नेते होते.
- ॲड. विष्णू ढोबळे, प्रदेशाध्यक्ष, समाजवादी जनपरिषद.

विद्यार्थी चळवळीतून पुढं आलेलं नेतृत्व
कॉ. सीताराम येचुरी हे जेएनयुचं प्रॉडक्ट. विद्यार्थी चळवळीतून त्यांचं नेतृत्व पुढं आलेलं होतं. इंग्रजी, हिंदी व तेलगू भाषेवर त्यांचं प्रभुत्त्व होतं. त्यांच्या जाण्यानं कम्युनिष्ट चळवळीचं मोठं नुकसान झालं आहे.
- कॉ. राम बाहेती, आयटक नेते.

सोप्या भाषेत विश्लेषण करण्याची हातोटी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दोन-तीनवेळा कॉ. सीताराम येचुरी यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग आला. विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळाली. लुंगी आणि बनियानवर त्यांनी माझ्यासोबत फोटो काढला. शहीद भगतसिंग हायस्कूलमध्ये शहीद भगतसिंग यांचा पुतळा त्यांच्या शुभ हस्ते उभारण्यात आला. महिला कॉलेजच्या प्रांगणामध्ये शेतमजुरांच्या मेळाव्यामध्ये त्यांचे भाषण ऐकण्याचाही योग आला होता. अत्यंत सोप्या भाषेत जातीय आणि वर्गीय विश्लेषण करण्यामध्ये त्यांची हातोटी होती.
-प्रशांत साठे, एसएफआयचे माजी पदाधिकारी

कॉ. येचुरी कम्युनिस्ट चळवळीचे आकर्षण
भारतातील तरुणांना कम्युनिस्ट चळवळीचे आकर्षण ज्यांच्यामुळे निर्माण झाले, त्यापैकी एक कॉ. सीताराम येचुरी यांचे व्यक्तिमत्त्व होते. विद्यार्थी, युवक, कामगार, शेतकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी वाहून घेतले. त्यांचा प्रभावी आवाज, मुद्देसूद मांडणी देशाच्या कायम स्मरणात राहील. जेएनयू ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव असा त्यांचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉ. सीताराम येचुरींना अखेरचा लाल सलाम.
- ॲड. कॉ. अभय टाकसाळ, राज्य कार्यकारिणी सदस्य, भाकप

डाव्या चळवळीची मोठी हानी
जेएनयूमधील संघर्षशील विद्यार्थी नेता ते कम्युनिस्ट खासदार आणि माकपा चे राष्ट्रीय महासचिव या पदावर कार्यरत राहिलेले काॅम्रेड सीताराम येचुरी यांना अखेरचा ‘लाल सलाम’. भारतीय डाव्या राजकारणात प्रगल्भ विचारवंत अशी ख्याती असणारे आणि आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीत देखील ओळख निर्माण करणारे सीताराम येचुरी यांच्या निधनाने डाव्या चळवळीची मोठी हानी झाली आहे. काॅ. येचुरी यांच्यासमवेत अनेक कार्यक्रमात मला सहभागी होण्याची संधी मिळाली होती. परभणी येथे अनेकदा त्यांचे भाषण आयोजित केले होते.त्यांच्या निधनाने कम्युनिस्ट चळवळीतील प्रगल्भ तारा हरपला आहे. माकपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदावर आल्यावर मोकळेपणाने भारतीय डाव्या चळवळीबद्दल,कम्युनिस्ट एकीकरण करण्याबद्दल भाष्य करून नवी उमेद जागवण्याचे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले आहे.
- काॅम्रेड राजन क्षीरसागर, राष्ट्रीय अध्यक्ष ,अखिल भारतीय किसान सभा

Web Title: Comrade Sitaram Yechury's close relationship with the movement of Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.