विद्यापीठाकडून प्रवेशाच्या आकड्यांची लपवाछपवी; पहिल्या फेरीत अत्यल्प प्रतिसाद

By राम शिनगारे | Published: July 23, 2024 03:25 PM2024-07-23T15:25:28+5:302024-07-23T15:25:51+5:30

आता विभागप्रमुखांच्या पातळीवर होणार प्रवेश

Concealment of admission figures by the University; Very little response in the first round | विद्यापीठाकडून प्रवेशाच्या आकड्यांची लपवाछपवी; पहिल्या फेरीत अत्यल्प प्रतिसाद

विद्यापीठाकडून प्रवेशाच्या आकड्यांची लपवाछपवी; पहिल्या फेरीत अत्यल्प प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व उपकेंद्रातील ५५ विभागांमध्ये सीईटीच्या माध्यमातून ’समर्थ’ पोर्टलद्वारे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २२ जुलै रोजी पहिल्या फेरीतील प्रवेशाची मुदत संपली आहे. तोपर्यंत ५५ विभागांमध्ये अत्यल्प प्रवेश झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने प्रवेशाच्या आकड्यांचीच लपवाछपवी सुरू केली आहे.

विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठासह धाराशिव उपकेंद्रातील ५५ विभागांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी १५ मे रोजी ऑनलाईन नाेंदणीला सुरुवात केली होती. ही नोंदणी संपल्यानंतर प्रत्येक अभ्यासक्रमानुसार सीईटी घेतली. या सीईटीनंतर गुणवत्ता यादी लावली. या गुणवत्ता यादीतील प्रवेशाची मुदत २२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता संपली. या मुदतीत विद्यापीठातील एकाही अभ्यासक्रमास पूर्णक्षमतेने प्रवेश झाले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच १० पेक्षा कमी प्रवेश असणाऱ्या विभागांची संख्याही २० पेक्षा अधिक असल्याचे समजते. पहिल्या फेरीची मुदत संपल्यानंतर ज्या विभागांमध्ये रिक्त जागा असतील त्याठिकाणी युजीसीच्या ई-समर्थ पोटर्लद्वारे प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच यापुढील प्रवेश प्रक्रियेचे अधिकार विभागप्रमुखांना दिले असल्याचेही विद्यापीठाच्या प्रशासनाने कळविले. पहिल्या फेरीतील प्रवेशाची आकडेवारी देण्यास प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह प्रवेश समितीचे अध्यक्ष कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी असमर्थता दर्शविली.

पहिल्यांदाच रसायनशास्त्राला कमी प्रवेश
विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागात प्रवेशासाठी राज्यभरातून विद्यार्थी येतात. त्यासाठी मोठा प्रतिसाद मिळतो. मात्र, विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच या विषयाला अवघे ३४ प्रवेश झाले आहेत. आता विभागस्तरावर किती प्रवेश होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याशिवाय अर्थशास्त्र २५, प्राणिशास्त्र, संगणकशास्त्र २५, इंग्रजी २०, मराठी ८, ग्रंथालय व माहितीशास्त्र ७, भूगोल विभागात ९ प्रवेश झाल्याचे संबंधित विभागातून समजले. अनके विभागप्रमुखांनी प्रतिसाद दिला नाही.

महाविद्यालयातील प्रवेश हाऊसफुल्ल
विद्यापीठातील विभागांमध्ये विद्यार्थी शोधण्याची वेळ आलेली असतानाच अनेक संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हाऊसफुल्ल झाले आहेत. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेशाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश प्रक्रियेसाठी केलेली दिरंगाईच कारणीभूत असल्याची चर्चा सुरू आहे.

Web Title: Concealment of admission figures by the University; Very little response in the first round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.