कर्ज घेऊन विकास ही संकल्पनाच अमान्य-आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:32 AM2017-09-03T00:32:44+5:302017-09-03T00:32:44+5:30
शहरातील विकास प्रकल्पांचा वाटा भरण्यासाठी आणि काही विकासकामे करण्यासाठी महापालिकेने १५० कोटींचे कर्ज घेतले असले तरी हे संपूर्ण कर्ज न घेता आवश्यक तेवढीच रक्कम घेतली जाईल, कर्ज काढून विकास ही संकल्पनाच आपल्याला मान्य नसल्याचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. मंजूर कर्जातील जवळपास ३० ते ४० कोटी रुपये उचलणार नसल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शहरातील विकास प्रकल्पांचा वाटा भरण्यासाठी आणि काही विकासकामे करण्यासाठी महापालिकेने १५० कोटींचे कर्ज घेतले असले तरी हे संपूर्ण कर्ज न घेता आवश्यक तेवढीच रक्कम घेतली जाईल, कर्ज काढून विकास ही संकल्पनाच आपल्याला मान्य नसल्याचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. मंजूर कर्जातील जवळपास ३० ते ४० कोटी रुपये उचलणार नसल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले.
महापालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी बहुतांश पदाधिकारी, नगरसेवकांनी अर्धवट विकासकामांचा उल्लेख केला. ही कामे पूर्ण होणे आवश्यक होते, असेही ते म्हणाले. या सर्व बाबींवर बोलताना आयुक्तांनी आपली भूमिकाही स्पष्टपणे सहभागृहात ठेवली. कचºयाच्या प्रश्नावर प्रशासन अपयशी ठरल्याचे त्यांनी कबूल केले. त्याचवेळी आर्थिक विषयावर मात्र आयुक्तांनी विरोधकांसह सत्ताधाºयांच्या डोळ्यातही अंजन घातले. महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता नवीन कामे करणे शक्यच नाही. त्यामुळेच मागील तीन महिन्यांपासून एकाही नवीन कामाच्या संचिकेला आपण मान्यता दिली नसल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.
त्याचवेळी पदाधिकाºयांसह नगरसेवकांनीही महापालिकेची आर्थिक बाजू समजून घेताना त्यासाठी कोणताही दबाव आणला नाही. यात सर्वांचेच सहकार्य राहिले आहे. महापालिकेला ४७ कोटींचे दायित्व असताना आणखी कर्ज घेऊन विकासकामे करणे म्हणजे येणाºया सभागृहाच्या डोक्यावर कर्ज ठेवणे चुकीचे ठरणार आहे.
विशेष म्हणजे, सभागृहाने जेएनएनयुआरएम, बीएसयुपी, नगरोत्थान योजना पूर्ण करण्यासाठी जो वाटा महापालिकेला भरावयाचा आहे त्यासाठी १५० कोटींचे कर्ज घेण्यास संमती दिली आहे. राज्य सरकारनेही या कर्जाची हमी घेतली आहे. मात्र १५० कोटींचे हे मंजूर कर्ज आवश्यकतेप्रमाणेच उचलले जाईल.
जुने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी महापालिकेचा आवश्यक तो वाटा या कर्जातून भरला जाईल. मात्र कर्ज काढून कोणतीही नवी कामे घेतली जाणार नाहीत, असेही ते म्हणाले. आगामी काळात महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. मालमत्ता कराची वसुलीही यापुढे वेळेत केली जाईल असेही देशमुख म्हणाले़