‘एक गाव एक गणपती’ संकल्पना ७८ गावांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:13 AM2017-08-31T00:13:58+5:302017-08-31T00:13:58+5:30
कंधार व उस्मानानगर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गावांत ‘श्रीं’ ची स्थापना करण्यात मंडळांनी मोठा पुढाकार घेतला. त्यात कंधार पोलीस ठाण्यांतर्गत ४० व उस्माननगर ठाण्यांतर्गत ३८ अशा ७८ गावांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना रुजविण्यात यश आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कंधार : कंधार व उस्मानानगर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गावांत ‘श्रीं’ ची स्थापना करण्यात मंडळांनी मोठा पुढाकार घेतला. त्यात कंधार पोलीस ठाण्यांतर्गत ४० व उस्माननगर ठाण्यांतर्गत ३८ अशा ७८ गावांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना रुजविण्यात यश आले.
कंधार पोलीस ठाण्यातंर्गत ११८ गावांचा समावेश आहे. ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यासाठी अथक परिश्रम घेण्यात आले. कंधार शहरात ३० ठिकाणी ‘श्रीं’ ची स्थापना करण्यात आली. तसेच ठाण्यातंर्गत असलेल्या गावात १५६ ठिकाणी ‘श्रीं’ ची स्थापना करण्यात आली. यात ४० ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेला मूर्तरुप आले. गणेशोत्सव शांततेने व उत्साहाने पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक भारती यांनी ‘श्री’ स्थापनेपूर्वीच गणेश मंडळाची बैठक घेतली. कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही केले.
पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गावात बंदोबस्त ठेवला आहे. गणेश विसर्जनदिनी शांतता व सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस निरीक्षक भारती, २ पोलीस उपनिरीक्षक, ३ पीएसआय,७२ पोलीस, ११ महिला पोलीस, गृहरक्षक दलाचे १५ जवान तैनात असतील. उस्माननगर पोलीस ठाण्यांतर्गत ६२ गावांचा समावेश होतो.
एकूण ‘श्री’ स्थापनेची संख्या ११२ असून ३८ गावांनी एक गाव एक गणपती हा उपक्रम राबविला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी शांतता समितीची बैठक घेऊन डीजेमुक्त करण्याचे मंडळांना आवाहन केले.
शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी २५ पोलीस, ३ महिला पोलीस व १५ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती अमोल उगावे यांनी दिली.
कंधार तालुक्यात गणेशोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची तसेच सामाजिक उपक्रमांची मोठी रेलचेल सुरु आहे.