राँगसाईड वाहतुकीस आळा घालण्यासाठी ‘टायर किलर’ची संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 07:20 PM2018-11-28T19:20:41+5:302018-11-28T19:20:51+5:30
‘टायर किलर’ गतिरोधक बसविण्याची संकल्पना राबविण्याची परवानगी पोलीस उपायुक्त दीपाली घाटगे यांनी रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत मागितली.
औरंगाबाद : शहरात राँगसाईड (विरुद्ध दिशने वाहतूक) वाहने चालविणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपघात होत असून त्याला आळा बसावा, यासाठी ‘टायर किलर’ गतिरोधक बसविण्याची संकल्पना राबविण्याची परवानगी पोलीस उपायुक्त दीपाली घाटगे यांनी मंगळवारी रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत मागितली.
सोबतच सिग्नल तोडणे, राँगसाईड जाणे, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे व इतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पोलीस प्रशासन शहरातून जो दंड वसूल करते त्या दंडातील २५ टक्के महसूल हा पोलीस प्रशासनाला मिळावा. ज्यातून वाहतुकीबाबत जनजागृती करणाऱ्या उपक्रमांना गती मिळेल. केंद्रीय आणि राज्य परिवहन विभागाकडून याबाबत परवानगी मिळण्यासाठी रस्ते सुरक्षा समितीने प्रयत्न करावेत, अशी सूचनाही घाटगे यांनी बैठकीत केली.
समितीचे अध्यक्ष खा. चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महापौर नंदकुमार घोडेले, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जि.प. सीईओ पवनीत कौर आदींसह रस्ते बांधकाम यंत्रणेतील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. खा. खैरे म्हणाले, तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी रस्ते रुंद करून श्रेय लाटले. लोकांनी घरे पाडली, जागा दिल्या, पुढे काहीही झाले नाही. अतिक्रमणे वाढली आहेत, रस्त्यांवर वाहतूक सूचनांचे फलक नाहीत. पोलीस यंत्रणा राँगसाईड वाहतुकीविरोधात दंडात्मक कारवाई करून मोकळी होते. चालकांना मार्गदर्शन करणेदेखील त्यांचे काम आहे. अवैध वाहतूक वाढली आहे. ट्रीपलसीट वाहनचालक बेभान चालतात. महापौर घोडेले म्हणाले, वाहतुकीच्या दृष्टीने मार्गदर्शक फलकांचे टेंडर १ कोटी १० लाखांचे असून ते लवकरच मंजूर होणार आहे.
उपायुक्त घाटगे म्हणाल्या, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने रद्दचे अधिकार आरटीओंना आहेत. ट्रिपलसीट जाणाऱ्या दुचाकीचालकाचा परवाना, वाहन नोंदणी रद्द करण्याबाबत पोलीस विचार करीत आहे. जालना रोड रुंदीकरण, रेल्वेस्टेशन पेट्रोलपंप हटविणे, गुलमंडी, कुंभारवाडा, गजानन मंदिर ते पुंडलिकनगर रोडवरील हातगाड्या आणि वाहतूक याप्रकरणी बैठकीत चर्चा झाली.
बांधकाम विभागाला नोटीस
बांधकाम विभागाचा कोणताही अधिकारी बैठकीला नव्हता. जालना रोडचे सध्या सुरू असलेले काम काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने झाले आहे. रस्त्याच्या कडेला उंच डांबरी थर टाकल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढू शकते, ही बाब जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांना बैठकीला गैरहजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्याचे समिती अध्यक्ष खैरेंनी सांगितले.