शेतकऱ्यांना चिंता; मृग नक्षत्राच्या मुहुर्ताला पावसाची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:47 PM2020-06-09T12:47:52+5:302020-06-09T12:53:54+5:30
मृग नक्षत्र लागले; परंतु अपवाद वगळता कुठेही दमदार पाऊस झाला नाही.
औरंगाबाद : रोहिणी नक्षत्राच्या शेवटच्या चरणामध्ये मराठवाड्यातील काही भागांत बऱ्यापैकी पाऊस झाला. तयार झालेले पावसाळी वातावरण पुढे टिकले नाही. रविवारी रात्री मृग नक्षत्र लागले; परंतु सोमवारी सायंकाळपर्यंत अपवाद वगळता कुठेही दमदार पाऊस झाला नाही. मृग नक्षत्राच्या मुहूर्ताला पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांत चिंता निर्माण झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातही पावसाने दांडी मारली. जिल्ह्यात रविवारपासून कोरडे वातावरण आहे. सोमवारीही पावसाची नोंद नाही. तापमानात वाढ झाली आहे.
पावसाची हुलकावणी
परभणी : पालम तालुक्यात रविवारी रात्री झालेला हलका पाऊस वगळता जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने हुलकावणी दिली आहे. रविवारी रात्री पालम तालुक्यात केवळ ०.६७ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.
जालन्यात पावसाची प्रतीक्षा
जालना : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात रविवारी रात्री भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव-शेरमूल परिसरात हलका पाऊस झाला. उर्वरित जिल्ह्यात अन्यत्र कुठेच सोमवारी सायंकाळपर्यंत पाऊस झाला नाही.
नांदेडमध्ये पाऊस नाही
नांदेड : जिल्ह्यात १ व २ जून रोजी रोहिण्याचा दमदार पाऊस झाल्यानंतर मृग नक्षत्राचा पहिला दिवस कोरडा गेला.
कुठे कुठे मृगाच्या किरकोळ सरी
बीड : बीड जिल्ह्यात रविवारी बीड, गेवराई आणि माजलगाव तालुका वगळता अन्य तालुक्यात मृगाचा पाऊस बरसलाच नाही. रविवारी बीडमध्ये दुपारी दहा मिनिटे तर गेवराई व माजलगाव तालुक्यात काही ठिकाणी मृगाच्या सरी कोसळल्या. परळी, धारूर, केज, अंबाजोगाई, शिरूर, पाटोदा, आष्टी आणि शिरुर तालुक्यात निरंक नोंद झाली. सोमवारी मात्र जिल्हाभरात कोठेही पाऊस झाला नव्हता. जूनच्या पहिल्या तीन दिवसांत पूर्वमोसमी पावसामुळे मृग नक्षत्रात पेरण्यांसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. मात्र नक्षत्रातील पहिले दोन दिवस असेच गेले.