काला दहीहंडीने नाथषष्ठीची सांगता; विक्रमी हजेरी लावलेल्या वारकऱ्यांचा पैठण नगरीस निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 07:58 PM2022-03-25T19:58:24+5:302022-03-25T19:58:35+5:30

सायंकाळच्या सुमारास मानाची नाथवंशजांची काला दिंडी गावातील नाथ मंदिरातून काढण्यात आली, पालखी ओटा मार्गे वाळवंटातून दिंडी नाथमंदिरात नेण्यात आली.

Concluding Nathashthi with Kaladahihandi; Farewell to Paithan Nagar of Warakaris with record attendance | काला दहीहंडीने नाथषष्ठीची सांगता; विक्रमी हजेरी लावलेल्या वारकऱ्यांचा पैठण नगरीस निरोप

काला दहीहंडीने नाथषष्ठीची सांगता; विक्रमी हजेरी लावलेल्या वारकऱ्यांचा पैठण नगरीस निरोप

googlenewsNext

पैठण (औरंगाबाद ): 
खडकी सोडियेला मोटा। अजीचा दहिकाला गोमटा ।। 
घ्यारे घ्यारे दहिभात। आम्हा देतो पंढरीनाथ  ।।

एकीकडे सुर्य मावळतीला जात असताना दुसरीकडे नाथमंदीरात भानुदास एकनाथच्या जयघोषात टाळ मृदंगाच्या खणखनणाटात षष्ठी महोत्सवाची काला दहिहंडी नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते फोडण्यात आली. आज काल्याचा प्रसाद  घेऊन वारकरी तृप्त मनाने परतीच्या मार्गावर चालते झाले. दरम्यान  शुक्रवारी नाथषष्ठीस आलेल्या वारकऱ्यांनी विविध फडावर काल्याचे किर्तन केले, फडावरच दहीहंडी फोडली, प्रसादाचे वाटप केले आणि पैठण नगरीचा निरोप घेतला.  

सायंकाळच्या सुमारास मानाची नाथवंशजांची काला दिंडी गावातील नाथ मंदिरातून काढण्यात आली, पालखी ओटा मार्गे वाळवंटातून दिंडी नाथमंदिरात नेण्यात आली. दरम्यान, कृष्ण दयार्णव महाराज यांची दिंडी ही मंदिरात दाखल झाली. त्याच वेळी दक्षिण दरवाजातून हभप अंमळनेरकर महाराज यांच्या दिंडीने नाथ मंदीरात प्रवेश केला. यावेळी मंदिरात भाविकांनी रिंगण करून पाउल्या खेळल्या,  महिला भाविकांनी फुगड्या खेळून  सेवा अर्पीत केली. भानुदास एकनाथाच्या गजरात वारकरी व भाविकांसह  खेळलेल्या पावल्यामुळे मंदिरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी हजारो महिला भाविकांनी सजवलेल्या कलशातून दहीहंडीचा प्रसाद करून आणला होता. दहिहंडी फुटताच मंदिरात भाविकांनी एकमेकांना काल्याचा प्रसाद वाटला. नाथषष्ठी महोत्सवासाठी पैठण नगरीत गेल्या तीन दिवसा पासून मुक्कामी असलेल्या विविध फडावरील दिंडीप्रमुखांनी आप आपल्या फडावर काल्याचे किर्तन करून  दुपारीच पैठण नगरिचा निरोप घेतला.  वारकऱ्यांना निरोप देताना आज पैठण करांना मात्र भरून येत होते.  

गुरुवारी रात्री १२ वाजेस  गावातील नाथ मंदिरातून नाथ महाराजांच्या पादुकांची छबीना पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखीत मोठ्या संखेने वारकरी सहभागी झाले होते. ठिकठिकाणी या पालखीवर नागरिकांनी पुष्प वृष्टी केली. पालखी - गोदावरी भेट झाल्यानंतर पालखीब पुन्हा नाथमंदिरात नेण्यात आले. शहर झाले सुने सुने वारकऱ्यांचे तीन दिवसा पासून पैठण नगरित असलेले वास्तव्य,  संत महंतांचे किर्तन ,भजन, दिंड्या, फड,राहूट्या, टाळ, मृदंग यासह भानुदास एकनाथाच्या गजराने पैठण नगरी गजबजून गेली होती. अनेक वर्षा पासून सातत्याने येणाऱ्या वारकऱ्यांचे  येथील नागरिकांशी आध्यात्मिक नाते गुंफले गेले असून यातून मोठा स्नेह निर्माण झालेला आहे. त्यातच दोन वर्ष कोरोना महामारीने वारकऱ्यांची भेट दुरावली होती.यामुळे यंदा वारकऱ्यांची मनोभावे सेवा करण्यात आली. शुक्रवारी वारकऱ्यांचे पैठण नगरितून प्रस्थान झाल्याने शहरातील हरिनामाचा गजर थंडावला,  या मुळे येते दोन तीन दिवस पैठणकरांना सुनेसुने वाटणार आहे. 

दहिहंडी च्या कार्यक्रमासाठी रोहयो मंत्री संदिपान भुमरे,  सुरज लोळगे,  दत्ता गोर्डे,  अनिल पटेल, संजय वाघचौरे, रविंद्र काळे,  सुचित्रा जोशी, तहसीलदार दत्ता निलावाड, मुख्याधिकारी संतोष आगळे,, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल,,  उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे,  तुषार पाटील, शेखर शिंदे, अप्पासाहेब गायकवाड, पवन लोहीया. शहादेव लोहारे, बाळू माने, कल्याण भुकेले, डॉ विष्णू बाबर, ज्ञानेश घोडके, सतिश पल्लोड, गणेश पवार, अजय परळकर, विजय सुते, भूषण कावसानकर, कृष्णा मापारी, ईश्वर दगडे,  महेश जोशी, अजित पगारे,  प्रकाश वानोळे,  शेखर पाटील,  जालिंदर आडसूळ,  भिकाजी आठवले,  रेखाताई कुलकर्णी, गौतम बनकर, सोमनाथ परदेशी,  फाजल टेकडी,  भाऊसाहेब पिसे, ज्ञानेश्वर कापसे,  राजू गायकवाड, स्वप्निल साळवे, सिध्दार्थ रोडगे, संतोष गव्हाणे,  शिवा पारिख,  राजू टेकाळे,  राखीपरदेशी, मंगल मगर, सुवर्णा रासणे, अपर्णा गोर्डे, अश्विनी लखमले, संगिता खरे, पुष्पा गव्हाणे, कांचन लेंभे, शितल लोळगे, अनिता जाधव,  आदीसह मोठ्या संखेने भाविक उपस्थित होते. 

काला दहीहंडीचे स्क्रीनवर प्रक्षेपण 
कालादहीहंडी सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी आज भाविकांची विक्रमी गर्दी झाली होती. मोठ्या संख्येने दिंड्या यंदा कालादहीहंडी साठी थांबल्याने गर्दीत वाढ झाली या मुळे नगर परिषदेच्या वतीने प्रांगणात सहा एलसीडी स्क्रीन लाऊन दहीहंडीचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. या मुळे दहीहंडी काल्यासाठी आलेल्या २५ ते ३० हजार भाविकांना  दहीहंडी सोहळ्याचा लाभ घेता आला. नाथसंस्थानच्या वतीने गेल्यावर्षी मंदीरा बाहेर दहीहंडी फोडण्याची सुरू सुरू केलेली परंपरा यंदाही दहीहंडी फोडून सुरू ठेवली. मंदीरा बाहेरील दहीहंडी हभप केशव महाराज उखळीकर यांच्या हस्ते फोडण्यात आली.

Web Title: Concluding Nathashthi with Kaladahihandi; Farewell to Paithan Nagar of Warakaris with record attendance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.