अट बारावी उत्तीर्ण, आले ५५ % पदव्युत्तर; पोलिस भरतीसाठी उच्च शिक्षितांच्या कष्टांची पराकाष्ठा
By सुमित डोळे | Published: June 20, 2024 06:45 PM2024-06-20T18:45:45+5:302024-06-20T18:48:14+5:30
नाेकऱ्यांची वानवा; बी.टेक., एल.एल.एम., एम.एस्सी., बी.फार्म, एम.बी.ए. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पाेलिस चालक पदासाठी अर्ज
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पोलिसांच्या चार विभागांसाठी सुरू झालेल्या भरती प्रक्रियेत ७५४ जागांसाठी लाखो उमेदवारांच्या संख्येने नोकऱ्यांची ‘वानवा’ पुन्हा एकदा अधोरेखित केली. बारावी उत्तीर्ण किमान शिक्षणाची अट असलेल्या पोलिस शिपाई व चालक पदासाठी बी.टेक., एल.एल.एम., एम.एस्सी, बी.फार्म, एम.बी.ए. उत्तीर्ण विद्यार्थी हजर राहिल्याचे पाहून वरिष्ठ पोलिस अधिकारीदेखील अचंबित झाले. जवळपास ५५ टक्के उमेदवार पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असल्याची आश्चर्यकारक बाब निदर्शनास आली.
बुधवारी शहर, तसेच जिल्हा पोलिस दलातील शिपाई व चालक पदासाठीच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला. शहर पोलिस दलासाठी २१२ जागांसाठी १६,१३३, तर जिल्हा पोलिस दलाच्या शिपाई पदाच्या १२६ जागांसाठी ४,४१८, चालक पदाच्या २१ जागांसाठी २,७२२ अर्ज प्राप्त झाले. त्याशिवाय लोहमार्ग विभागाच्या ८० पदांसाठी ४,२२९ व कारागृहाच्या ३१५ जागांसाठी ७०,३३३ उमेदवारांनी अर्ज केला आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या गोकुळ मैदानावर जिल्हा पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये महिला पोलिस शिपायांच्या ३९ पदांसाठी ८६५, तर चालक पदाच्या सहा जागांसाठी १७२ महिलांनी अर्ज केला आहे.
जिल्हा पोलिसांच्या भरतीमध्ये १ हजार पुरुष उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यापैकी ६३८ उमेदवार उपस्थित राहिले आहेत. त्यांच्यापैकी १०६ उमेदवार अपात्र ठरून ५३२ उमेदवारांनी मैदानी चाचणी परीक्षा दिली. शेंद्रा परिसरात त्यांची धावण्याची चाचणी घेण्यात आली.
अट बारावी उत्तीर्ण, आले मात्र ५५ % पदव्युत्तर
पोलिस भरतीसाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र ठरू शकतात. मात्र, यंदा भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी आश्चर्यकारकरीत्या २५ % च उमेदवार बारावी उत्तीर्ण, तर उर्वरित उच्चशिक्षित आहे. उर्वरित सर्व उमेदवार हे पदवी, पदव्युत्तर आहेत. अभियांत्रिकी, फार्मसी, सायन्स, कॉमर्स, संगणक शास्त्र, एमबीए उत्तीर्ण विद्यार्थ्यांनीदेखील अक्षरश: चालक, शिपाई पदाच्या नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
जिल्हा पोलिसांच्या भरतीला उपस्थित उच्चशिक्षित
शिक्षण शिपाई चालक
बीई/एम.ई/बी.टेक ६३ ३५
एम.बी.ए./बी.बी.ए. १५ १९
एम.सी.ए./बी.सी.ए. २२ २३
एम. कॉम./बी.कॉम २३८ १६५
एम.ए. ८९ ६२
बी.एस्सी/एम.एस्सी ५१२ ३४४
एम.फार्म/बी.फार्म २० १२
एल.एल.बी./एल.एल.एम. २ ४