रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल; बाहेर नातेवाईक बेहाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:02 AM2021-04-14T04:02:06+5:302021-04-14T04:02:06+5:30
औरंगाबाद : परगावावरून शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल केलेल्या कोरोना रुग्णांना आजाराने वेदना होत आहेत, पण त्यांच्या मदतीसाठी बाहेर सदैव ...
औरंगाबाद : परगावावरून शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल केलेल्या कोरोना रुग्णांना आजाराने वेदना होत आहेत, पण त्यांच्या मदतीसाठी बाहेर सदैव हजर असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाचा उद्रेक वाढला. पहिले शहरात व आता ग्रामीण भागाला कोरोनाने विळख्यात घेतले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातूनच नव्हे, तर परजिल्ह्यातून कोरोना रुग्ण उपचारासाठी शहरात येत आहेत. त्या रुग्णासोबत त्याचे दोन ते तीन नातेवाईकही असतात. कोरोना रुग्ण असल्याने रुग्णालयामध्ये त्याच्या नातेवाईकांना मुक्कामी राहण्यास मनाई आहे.
सर्वसामान्य नागरिकांना लॉजिंग-बोर्डिंगमध्ये राहणे परवडत नाही. तसेही शहरातील लॉजिंग बंद केलेली आहेत. यामुळे रात्री मुक्काम कुठे करावा, असा यक्षप्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांना पडत आहे. आमच्या प्रतिनिधीने घाटी परिसरात पाहणी केली असता, मेडिसिनच्या नवीन इमारतीबाहेर एक पत्र्याचे शेड आहे. तिथे कोरोना रुग्णांचे नातेवाईक राहत आहेत. तिथेच उघड्यावर झोपत आहेत. एवढेच नव्हे, तर शहरातील खासगी रुग्णालयांबाहेर हीच परिस्थिती आहे. घाटीत शेड तरी आहे, खासगी रुग्णालयांबाहेर शेडही नाही. अनेक जण झाडाच्या सावलीत बसून दिवस - रात्र काढत आहेत.
यात महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. उघड्यावर झोपायचे कसे? स्वच्छतागृह नाही, अंघोळीची सोय नाही, कोरोनाबाधित रुग्णासमवेत आल्याने शहरातील नातेवाईकांकडेही जाता येत नाही. एक ना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
चौकट
रुग्णालयापेक्षा बाहेर जगणे कठीण
रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णाची देखभाल करण्यासाठी डॉक्टर्स, नर्स असतात. मात्र, ५ एप्रिलपासून बाहेर आम्ही रस्त्यावर बसून कसे दिवस काढतोय, ते आम्हालाच माहीत. बाहेर जगणे कठीण झाले आहे. कारण, राहण्यासाठी सोय नाही.
- समाधान करघे, रेलगाव
---
महिलांना अधिक अडचणी
माझे पती १ एप्रिलपासून रुग्णालयात ॲडमिट आहेत. आम्हाला येथे पत्र्याच्या शेडखाली राहावे लागते. येथे उघड्यावरच झोपावे लागते. अंघोळीची, स्वच्छतागृहाची काहीच सोय नाही. हीच मोठी अडचण ठरत आहे.
- संगीता भोकरे
कन्नड
--
जीव मुठीत घेऊन जगतो
मागील १८ दिवसांपासून आम्ही घाटीत पत्र्याच्या शेडखाली दिवस काढत आहोत. निरोप आला की, इंजेक्शन, औषधी आणण्यासाठी जावे लागते. ३० रुपयात जेवण मिळते, पण येथे अस्वच्छता आहे. सर्व कोरोना रुग्णांचे नातेवाईक आजुबाजूला असल्याने संसर्ग पसरू शकतो. यामुळे सर्वजण जीव मुठीत घेऊन जगत आहोत.
- स्वाती शहाणे
गंगापूर
चौकट
नातेवाईकांकडे जाता येत नाही
आमच्या घरातील व्यक्ती कोरोनाबाधित आली. खासगी रुग्णालयात दाखल केले. शहरात आमचे बरेच नातेवाईक आहेत. पण कोरोना रुग्ण सोबत असल्याने आम्हाला त्यांच्याकडे जाता येत नाही. नातेवाईकही फोनवरच चौकशी करण्यात धन्यता मानत आहेत. काही नातेवाईकांनी तर मागील १० दिवसांपासून आम्हाला वाळीतच टाकल्यासारखेच वाटत आहे, अशा भावना कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या.
३) नातेवाईकांकडे जाता येत नाही अन् दुकानात काही मिळत नाही (बाॅक्स)