मनोज जरांगे पाटील यांच्याकडून कावळे कुटुंबीयांचे सांत्वन

By बापू सोळुंके | Published: October 22, 2023 10:33 PM2023-10-22T22:33:05+5:302023-10-22T22:34:18+5:30

Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळेपर्यंत आपल्याला लढायचे आहे. लढून मरू, पण कोणीही आत्महत्या करू नका, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना केले.

Condolences to the Kawle family from Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांच्याकडून कावळे कुटुंबीयांचे सांत्वन

मनोज जरांगे पाटील यांच्याकडून कावळे कुटुंबीयांचे सांत्वन

- बापू सोळुंके
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण मिळेपर्यंत आपल्याला लढायचे आहे. लढून मरू, पण कोणीही आत्महत्या करू नका, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना केले. आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आत्महत्या केलेल्या सुनील कावळे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जरांगे पाटील हे रविवारी त्यांच्या घरी गेले होते.

यावेळी सुनील यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि अन्य नातेवाइकांनी हंबरडा फोडला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी सुनीलची भावना होती आणि ते आरक्षण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालीच मिळू शकेल असा विश्वासही त्यांना होता, असे त्यांच्या नातेवाइकांनी जरांगे यांना सांगितले. जरांगे यांनी तासभर बसून कावळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. सांत्वन करताना जरांगे यांचे डोळेही पाणावले होते. त्यांच्याशी संवाद साधताना छत्रपती संभाजीनगरमधील मराठा समाज कावळे कुटुंबीयांना उघड्यावर सोडणार नाही. समाजासाठी सुनील यांनी दिलेले बलिदान समाज कदापि विसरणार नाही, अशी ग्वाही दिली. सुनील यांच्या मुलाला नोकरी देण्याचे लेखी आश्वासन शासनाने दिले असल्याने त्यांनी तेथूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून सुनील यांच्या मुलाच्या नोकरीचा विषय तातडीने मार्गी लावण्याचे सांगितले. मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्यांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. आरक्षण मिळण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यामुळे तरुणांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
मौन पाळून श्रद्धांजली
मनोज जरांगे हे येणार असल्याचे कळताच परिसरातील हजारो नागरिकांनी तेथे गर्दी केली होती. जरांगे आणि उपस्थितांनी दोन मिनिटे मौन बाळगून कावळे यांना श्रद्धांजली वाहिली.

Web Title: Condolences to the Kawle family from Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.