बाजार समितीत हमीभाव खरेदी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:50 AM2017-10-27T00:50:50+5:302017-10-27T00:51:45+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये गुरुवारी नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते या खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये गुरुवारी नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते या खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले.
परभणी जिल्ह्यात खरीप हंगामातील मूग, उडीद आणि सोयाबीन ही पिके बाजारात आली आहेत. मात्र खुल्या बाजारपेठेत हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला.
जिल्ह्यातील ६ ठिकाणी हे केंद्र सुरु झाले आहे. गुरुवारी बाजार समितीच्या मार्केट यार्डात जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते काटा पूजन करुन खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सभापती समशेर वरपूडकर, संचालक गणेश घाटगे, तहसीलदार कडवकर, जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी, सहाय्यक निबंधक प्रकाश राठोड यांच्यासह बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.
परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभाव दराने खरेदी केंद्र सुरु करण्यात आले असले तरी शासनाच्या नियमानुसार शेतकºयांना सुरुवातीला खरेदी-विक्री संघामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या शेतकºयांचाच माल खरेदी केला जाणार आहे. मात्र नोंदणीला शेतकºयांचा प्रतिसाद मिळत नसल्याने हमीभाव खरेदी केंद्रावर कृषी मालाची खरेदीही अत्यल्प प्रमाणात होत आहे.
शेतकºयांनी बाजार समितीच्या यार्डातच असलेल्या तालुका खरेदी- विक्री संघाच्या कार्यालयात नोंदणी करावी आणि चांगल्या प्रतीचा स्वच्छ माल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समशेर वरपूडकर यांनी केले आहे.