विद्यार्थ्यांसमोरच शिक्षकाची मुख्याध्यापकास शिवीगाळ; माफीनाम्यानंतर प्रकरण मिटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 05:07 PM2018-11-29T17:07:45+5:302018-11-29T17:09:11+5:30
संस्थाचालकाच्या उपस्थितीत शिक्षकाने माफीनामा दिल्यामुळे प्रकरण पोलिसांत न जाता शाळेतच मिटविण्यात आले.
औरंगाबाद : शाळेसमोरील रस्त्यावर मोटारसायकल लावू नका, असे सांगितले म्हणून मुख्याध्यापकास शाळेतील शिक्षकाने शिवीगाळ केल्याचा प्रकार मुकुंदवाडी, प्रकाशनगरातील ज्ञानदीप विद्यामंदिर शाळेत घडला. संस्थाचालकाच्या उपस्थितीत शिक्षकाने माफीनामा दिल्यामुळे प्रकरण पोलिसांत न जाता शाळेतच मिटविण्यात आले.
ज्ञानदीप विद्यामंदिर शाळेत बुधवारी गोवर-रुबेला लस आणि महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परिसरातील पालकांनाही आमंत्रित केले होते. शाळेतील सहशिक्षक पंढरीनाथ खंदारे यांनी शाळेच्या दरवाजाच्या बाजूलाच मोटारसायकल उभी केल्यामुळे त्यांना ती काढून समोरच्या मैदानात लावण्याची सूचना माध्यमिकचे प्राध्यापक रमेश आकडे यांनी केली. याचा राग आल्यामुळे खंदारे यांनी आकडे यांना शाळेच्या प्रवेशाद्वारातच शिवीगाळ केली. यावेळी विद्यार्थी व पालकही उपस्थित होते.
हा प्रकार सकाळी ७.१५ वाजता घडल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या बघ्यांची गर्दी जमली होती. शाळेतील इतर शिक्षकांनी मध्यस्थी करून दोघांनाही बाजूला नेले. यामुळे हाणामारीचा प्रसंग टळला. मात्र, या शिवीगाळीचा प्रकार शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सीसीटीव्ही दाखवून घडलेली सर्व हकीकत मुख्याध्यापकांनी ‘लोकमत’शी बोलताना विशद केली. संस्थाचालक सुनील पालवे यांनीही शाळेत धाव घेत सीसीटीव्ही पाहिल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची सूचना केली. यानुसार पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वीच संबंधित शिक्षकाने अनवधानाने हा प्रकार घडला असून, त्याबद्दल लेखी दिलगिरी व्यक्त केली.
हा चुकीचा प्रकार
शाळेत घडलेला प्रकार चुकीचा आहे. मागील दोन वर्षांत शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. मात्र, शाळेतील दोन शिक्षक या विकासात्मक कामात, अशा पद्धतीने वागून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी यापुढे काही गैरप्रकार केल्यास त्यांना योग्य पद्धतीने धडा शिकविण्यात येईल.
- सुनील पालवे, संस्थाचालक