करोडीत ग्रामस्थ -अतिक्रमणधारकांत संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 10:20 PM2019-07-26T22:20:34+5:302019-07-26T22:20:48+5:30
अतिक्रमणे काढण्यावरुन ग्रामस्थ आणि अतिक्रमणधारकांत संघर्ष उडाल्याचे दिसून आले.
वाळूज महानगर : करोडी येथील सरकारी जागेवरील अतिक्रमणावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकांनी काही खाजगी जमिनीवरही अतिक्रमण केल्याचे आढळून आले. त्यामुळे अतिक्रमणे काढण्यावरुन ग्रामस्थ आणि अतिक्रमणधारकांत संघर्ष उडाल्याचे दिसून आले. परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.
साजापूर-करोडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील गट नंबर २४ मधील विविध शासकीय कार्यालयांना दिलेल्या जमिनीवर तीन दिवसापासून असंख्य लोकांनी कब्जा केला आहे. त्यातच शासनाकडून घरकुलासाठी मोफत भूखंड वाटप केला जात असल्याची अफवा पसरल्याने गर्दी वाढतच आहे.
ट्रॉन्सपोर्ट हबच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे लक्षात येताच रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता सुधाकर बाविस्कर यांनी दौलताबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. करोडी येथील शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्यानंतर गुरुवारी रात्रीपासून विविध ठिकाणांवरुन आलेल्या लोकांनी आपला मोर्चा परिसरातील खाजगी गट नंबरवरील जमिनीकडे वळविला आहे. विशेष म्हणजे शेतजमिनीवर पिके घेतली जात आहेत. काही लोकांनी शुक्रवारी खाजगी जमीनी बळकावण्याचा प्रयत्न सुरु केल्याची माहिती मिळताच करोडी व शरणापुरातील जवळपास ५० तरुण एकत्र आले होते. या तरुणांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या शासकीय व खाजगी जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.
दरम्यान, दुपारी १२ वाजेच्या सुमारास हे तरुण आरटीओ कार्यालयासमोरील अतिक्रमणे हटविण्याचा प्रयत्न करीत असताना अतिक्रमणधारकांशी त्यांचा वाद झाला. यावेळी अतिक्रमणधारकांनी लाठ्या-काठ्या व हत्यारे घेऊन त्यांचा पाठलाग सुरु केला. जिवाच्या भितीमुळे अतिक्रमणे हटविण्यासाठी आलेले तरुण पळून गेले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.