अधिसभा सदस्य अन् कुलगुरूंमध्ये संघर्षाचा भडका
By राम शिनगारे | Published: June 16, 2024 10:14 PM2024-06-16T22:14:05+5:302024-06-16T22:14:14+5:30
प्रसिद्धीपत्रकाद्वारे साधला निशाणा,
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांना कुलगुरू विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर भेटण्यासाठी वेळ देत नाहीत. विश्वासात घेत कोणताही निर्णय घेत नसल्याचा आरोप करणारे प्रसिद्धीपत्रक अधिसभा सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी काढले आहे. त्यामुळे कुलगुरू आणि अधिसभा सदस्यांमध्ये संघर्षाचा भडका उडाला असल्याचे स्पष्ट झाले.
काही महिन्यांपूर्वी विद्यार्थी संघटनांन आणि कुलगुरूंमध्ये गुन्हे दाखल केल्याच्या घटनेवरुन संघर्ष झाला होता. आता अधिसभा सदस्य तथा व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र काळे यांनी कुलगुरूंविषयी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यात दीक्षांत सोहळ्यात मोजक्याच विद्यार्थ्यांना व्यासपीठावर प्रमाणपत्र स्विकारण्याची संधी दिली. त्यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांनी सोहळ्याकडे पाठ फिरवली. त्या दिवशी तगडा पोलिस बंदोबस्त मागवला. विद्यापीठात पोलिस बोलावण्याची गरज कशी पडते? असा सवाल उपस्थित केला. विद्यार्थी व पदवीधरांशी निगडीत बहुतांश प्रश्न चर्चेच्या माध्यमातुन सोडवता येतात. मात्र, कुलगुरू अधिसभा सदस्यांना विश्वासात घेऊन संवाद साधण्यापेक्षा टाळत आहेत. वसतिगृहाचे शुल्क वाढविताना मराठवाड्याच्या दुष्काळाकडे दुर्लक्ष केले. इतर विद्यापीठात ‘पेट’ परीक्षा नियमित होत असताना आपल्याकडे घेतली जात नाही. प्राधिकरणाच्या सदस्यांना भेटण्यासाठी कुलगुरू वेळ देत नाहीत. तसेच काही अधिसभा सदस्यांना त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची धमक्या देण्यात येत असल्याचा आरोपही डॉ. काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. या भुमिकेशी अनेक अधिसभा सदस्य सहमत असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.
प्रशासनाचा प्रतिक्रियेस नकार
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांना यावर प्रतिक्रियेसाठी फोन, एसएमएसद्वारे संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनीही प्रतिसाद दिला नाही. तसेच विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाने यावर प्रशासनाकडून प्रतिक्रिया देण्यात येणार नसल्याचे कळविले.