झगडा परिस्थितीशी; मात्र इमानदारीशी तडजोड नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:04 AM2021-09-03T04:04:36+5:302021-09-03T04:04:36+5:30
सोयगाव : शेतकरी हा नेहमी आर्थिक चणचणीचा सामना करतो, उसनवारी, कर्जासाठी वणवण भटकतो, काळ्या आईशी इमान राखणारा हा शेतकरी; ...
सोयगाव : शेतकरी हा नेहमी आर्थिक चणचणीचा सामना करतो, उसनवारी, कर्जासाठी वणवण भटकतो, काळ्या आईशी इमान राखणारा हा शेतकरी; मात्र इमानदारीत कसलीही तडजोड करीत नसल्याची एक घटना जंगला तांडा येथे उघडकीस आली आहे. बँकेकडून नजरचुकीने शिल्लक आलेली १ लाख ८० हजार रुपयांची रक्कम एकनाथ मूलचंद राठोड या शेतकऱ्याने परत केली आहे. त्यांच्या या इमानदारीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
जंगलातांडा येथील शेतकरी एकनाथ राठोड यांनी सोयगावच्या जिल्हा बँकेच्या शाखेतील खात्यात ७५ हजारांचा धनादेश वटविण्यासाठी दिला होता; कॅशिअरने नजरचुकीने राठोड यांना २ लाख ५५ हजार रुपये इतकी रक्कम दिली. राठोड यांनी सदर रक्कम न मोजता ती खिशात घालून ते जंगला तांडा येथील घरी गेले. घरी ते पैसे मोजू लागल्यानंतर त्यांना धक्काच बसला. यात १ लाख ८० हजार रुपये त्यांना शिल्लक मिळाले होते. कॅशिअरच्या नजरचुकीने हे पैसे आपल्याकडे आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विचार न करता ही बाब वडील मूलचंद राठोड यांना सांगितली. यानंतर वडील मूलचंद राठोड, एकनाथ राठोड व बाबू राठोड यांनी थेट सोयगावची बँक गाठून शिल्लक मिळालेली रक्कम बँकेच्या अधिकाऱ्यांकडे परत केली. त्यांच्या या इमानदारीमुळे बँक प्रशासनाकडून व नागरिकांकडून त्यांची प्रशंसा होत आहे. यामुळे शेतकरी नुसता मातीशीच इमानदार राहत नाही, तर अख्ख्या जीवनातही त्याची इमानदारी अढळ असल्याचे या घटनेवरुन दिसून आले.
फोटो : सोयगावच्या जिल्हा बँकेच्या शाखेतून चुकून आलेली शिल्लकची रक्कम परत करतांना शेतकरी मूलचंद राठोड व इतर.
020921\2034-img-20210902-wa0160.jpg
सोयगाव-सोयगाव च्या जिल्हा बँकेच्या शाखेत शिल्लक ची रक्कम परत करतांना सगेटकरी मूलचंद राठीड व इतर