गुणवत्ता व सभ्यतेचा संगम, कर्तबगार व्यक्तिमत्व कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 11:49 AM2024-12-02T11:49:05+5:302024-12-02T11:56:37+5:30

अत्यंत अभ्यासू व प्रामाणिक डॉ. शिवराज नाकाडे यांनी वकिली केली असती, तर लाखोंची कमाई करता आली असती, पण शिक्षणावर निष्ठा असणाऱ्या डॉ. नाकाडेंनी आपला अध्यापन व अध्ययन धर्म सोडला नाही. त्यांच्या या अतुलनीय योगदानाची व क्रियाशील वृत्तीची दखल घेत त्यांना नामविस्तार झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पहिले पूर्णवेळ कुलगुरू होण्याचा सन्मान मिळाला.

Confluence of quality and civility, accomplished personality Vice Chancellor Dr. Shivraj Nakade | गुणवत्ता व सभ्यतेचा संगम, कर्तबगार व्यक्तिमत्व कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे

गुणवत्ता व सभ्यतेचा संगम, कर्तबगार व्यक्तिमत्व कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे

- प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे ( माजी कुलगुरू) 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कर्तबगार व सुसंस्कृत माजी कुलगुरू व लातूरच्या दयानंद विधि महाविद्यालयाचे दीर्घकालीन प्राचार्य, केंद्र- राज्य संबंधाचे राष्ट्रीय दर्जाचे संशोधक डॉ. शिवराज नाकाडे यांचे निधन म्हणजे मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या व काहीही शैक्षणिक परंपरा नसलेल्या तरीही कर्तबगार ठरलेल्या व सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या पहिल्या पिढीच्या प्रतिनिधीचे निधन म्हणायला हवे. पूर्वीच्या उस्मानाबाद व आताच्या लातूर जिल्ह्यातील चाकूरचा प्रतिभावान तरीही सुसंस्कृत नि विनम्रवृत्तीचे डॉ. नाकाडे यांनी हैदराबाद येथील प्रख्यात विवेक वर्धिनी महाविद्यालयातून गुणवत्तापूर्णरितीने पदवी घेतली. राज्यशास्त्रात पद्व्युत्तर शिक्षण उत्तम गुणांनी केलं. विधि (लॉ) एलएलएम पदवी उस्मानिया विद्यापीठातून घेतली. लॉ विषयात डॉक्टरेट केली. त्याकाळी लॉमध्ये डॉक्टरेट करणारे दोन-चारच होते.

प्राचार्य राहून शेकडो वकिलांची फौज घडवली
आरंभापासून अतिशय कष्टाळू व अभ्यासू असणारे डॉ. शिवराज नाकाडे यांनी केंद्र- राज्य संबंध व भारतीय घटना या विषयावर मौलिक संशोधन केलं होतं. त्यांचा या विषयावरील इंग्रजी ग्रंथ मैलाचा दगड मानला जातो. हैदराबादहून परतल्यावर दयानंद शिक्षण संस्थेने विधि महाविद्यालय लातूरला काढले व डॉ. नाकाडे यांना प्राचार्यपद सन्मानानं दिलं गेलं. विनाअनुदान महाविद्यालय असलं तरी डॉ. नाकाडे यांनी जीव ओतून काम केलं. शेकडो वकिलांची पहिली पिढी घडविली. इतकेच नव्हे तर राज्यातील विधि महाविद्यालयांना अनुदान मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत वीस वर्षे लढा दिला व न्याय मिळविला. डॉ. नाकाडे यांची लढाऊ वृत्ती व चिकाटी सर्वांनी पाहिली.

कुलगुरू पदाचा सन्मान
अत्यंत अभ्यासू व प्रामाणिक डॉ. शिवराज नाकाडे यांनी वकिली केली असती, तर लाखोंची कमाई करता आली असती, पण शिक्षणावर निष्ठा असणाऱ्या डॉ. नाकाडेंनी आपला अध्यापन व अध्ययन धर्म सोडला नाही. त्यांच्या या अतुलनीय योगदानाची व क्रियाशील वृत्तीची दखल घेत त्यांना नामविस्तार झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पहिले पूर्णवेळ कुलगुरू होण्याचा सन्मान मिळाला. त्याआधी ते विधि अधिष्ठाता होतेच. अशी अनपेक्षित संधी निवृत्तीच्या उंबरठ्यावर मिळाल्यावर डॉ. नाकाडे यांनी झपाटल्यागत निर्मोही वृत्तीने काम केले. नामविस्ताराचा निधी योग्य रीतीनं वापरून संगणकशास्त्र, पर्यटनशास्त्र, पर्यावरणशास्त्र या विभागांची उभारणी व सुरुवात केली. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून उर्दू व लॉ, पाली व बुद्धिझम विभागांची मागणी पूर्ण करून घेतली. तेही विभाग सुरू केले. विद्यापीठाचे भव्य नाट्यगृह बांधून पूर्ण केले. अनेक वर्षांपासून रिक्त प्राध्यापकांची पदे भरली. स्पेशल ड्राइव्ह घेऊन राखीव पदे मोठ्या संख्येने भरली. अनेक जण प्राध्यापक झाले. इतकेच नव्हे तर मोजक्याच महिला प्राध्यापक असणाऱ्या विद्यापीठात अनेक महिला प्राध्यापकांची नेमणूक केली. समतावादी कृती करणारे कुलगुरू अशी कामं केली हे कुणीही नाकारू शकत नाही. कमवा-शिका योजनेचा विस्तार केला. मागासवर्गीय व खुल्या वर्गातील मुलांना समान दिवस काम दिले, मानधन वाढवले. मुलींनाही कमवा-शिका योजनेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा सहकारी म्हणून मला संचालक विद्यार्थी कल्याण विभागात दोन टर्म काम करता आलं व त्यांचे नेतृत्व गुण अनुभवता आले व मलाही खूप शिकता आले. झेरॉक्स सेंटर, फाइलपॅड मेकिंग युनिट सुरू केली. केंद्रीय युवक महोत्सवाची सुरुवात केली.

घेतला वसा सोडला नाही
कुलगुरूंना जाती-पातीपलीकडे राहून विद्यापीठ हिताचं काम करावं लागतं. विरोध व दबाव गटांना तोंड द्यावं लागतं. क़ायदा व राज्यशास्त्राचे तज्ज्ञ या नात्यानं हे सारं त्यांनी लिलया सांभाळलं. सभ्यता व सुसंस्कृतता यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यांच्या सरळ मराठवाडी भाषेची टिंगलही होतं असे, पण त्यांनी मातीशी नातं तोडलं नाही. सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंना खूप काही सहन करावं लागतं. ते नाकाडे सरांनी सारं पचवलं, पण घेतला वसा सोडला नाही. कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे यांना विनम्र आदरांजली.. ! विद्यापीठानं विधि विभागाला त्यांचं नावं द्यावं असं वाटतं. कुलगुरू डॉ. विजय फुलारी व व्यवस्थापन परिषद याचा जरूर विचार करेल, अशी आशा आहे.

Web Title: Confluence of quality and civility, accomplished personality Vice Chancellor Dr. Shivraj Nakade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.