फटाका मार्केटवर संभ्रम कायम; चेंडू पोलीस आयुक्तांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:42 AM2017-10-13T00:42:45+5:302017-10-13T00:42:45+5:30
फटाका मार्केटचे अंतर निवासी भागापासून २५० मीटर दूर मोकळ्या जागेत असावे, असे आदेश आहेत. यानुसार शहर व परिसरातील १० फटाका मार्केटची पाहणी करून परवानगी द्यायची का नाही, याचा निर्णय पोलीस आयुक्त यशस्वी यादव घेणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : फटाका मार्केटचे अंतर निवासी भागापासून २५० मीटर दूर मोकळ्या जागेत असावे, असे आदेश आहेत. यानुसार शहर व परिसरातील १० फटाका मार्केटची पाहणी करून परवानगी द्यायची का नाही, याचा निर्णय पोलीस आयुक्त यशस्वी यादव घेणार आहेत. या नियमात एकही फटाका मार्केट बसत नाही. यामुळे फटाका विक्रेत्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम गुरुवारीही कायम होता.
मागील वर्षी जिल्हा परिषद मैदानावर फटाका मार्केटला मोठी आग लागली होती. यात संपूर्ण दुकाने जळून खाक झाली होती. नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने निवासी भागात फटाका मार्केटला परवानगी देऊ नये, असे आदेश दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय, महानगरपालिका प्रशासन सावधगिरीने पावले उचलत आहेत. रेल्वेस्टेशन परिसरातील अयोध्यानगरी, हडकोतील टीव्ही सेंटर मैदान, फरशी मैदान, सिडको राजीव गांधी क्रीडांगण, शिवाजीनगर, एन-२, चिकलठाणा, मुकुंदवाडी, पंढरपूर, रांजणगाव आदी ठिकाणी सुमारे ३०० विक्रेत्यांना परवानगीची प्रतीक्षा आहे. निवासी भागापासून २५० मीटर दूर फटाका मार्केट असेल तरच परवानगी देण्यात येईल, अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी घेतली. त्यानुसार पोलीस विभाग, पोलीस वाहतूक विभाग, बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आज विविध ठिकाणच्या फटाका मार्केटची पाहणी केली. निवासी भागापासून किती दूर आहे याची मोजणीही केली. सायंकाळी याचा अहवाल पोलीस आयुक्तांना देण्यात आला. आता पोलीस आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.