भाजप कार्यकर्त्यांमध्ये घालमेल; राज्यात सत्ता आल्यास आनंद, चिंता वाढत्या स्थानिक स्पर्धेची

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 12:00 PM2022-06-23T12:00:38+5:302022-06-23T12:01:21+5:30

शिवसेनेची ए टीम सोबत आल्यास आपले काय होणार?

Confusion among BJP workers; Happiness if power comes to the state, anxiety of increasing local competition | भाजप कार्यकर्त्यांमध्ये घालमेल; राज्यात सत्ता आल्यास आनंद, चिंता वाढत्या स्थानिक स्पर्धेची

भाजप कार्यकर्त्यांमध्ये घालमेल; राज्यात सत्ता आल्यास आनंद, चिंता वाढत्या स्थानिक स्पर्धेची

googlenewsNext

औरंगाबाद : राज्याच्या राजकारणाचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले असून, त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करीत सत्ता मिळवली तर आपले काय होणार, या चिंतेने भाजपतील इच्छुक आतून धास्तावले आहेत.

ते सध्या उघडपणे बोलत नसले तरी मागील अडीच वर्षे भाजपचे काम करताना शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जो ‘पंगा’ घेतला आहे, त्याचे फळ म्हणून पुन्हा राजकीय बळी जाणार असेल तर आपण काय करायचे, यावर अनेकजण खल करू लागले आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषद, ९ पंचायत समिती, महापालिका आणि चार नगरपालिकेच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत. तसेच पुढे विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय उलथापालथीचा जिल्ह्यावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभेसाठी भाजपकडून तयारी करीत असलेल्यांची प्रतिक्रिया आज जरी पक्ष भावनेच्या बाजूने असली तरी भविष्यातील समीकरणावर सगळे काही अवलंबून असेल, असेही मत अनेकांनी मांडले.

हिंदुत्व टिकवणे महत्त्वाचे
मध्य मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार संजय केणेकर म्हणाले, सध्या हिंदुत्व टिकवणे महत्त्वाचे आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर पुढील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाही मिळाली तरी चालेल. पक्ष आदेश व हिंदुत्वासाठी आमच्यासारख्यांचा बळी जात असेल तर आनंदच आहे. आज शिवसैनिकांच्या भावना अनावर होत असल्याचे पाहिले; परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेची युती झाल्यानंतर हिंदुत्वाच्या भावनांचे काय झाले होते, असा सवालही केणेकर यांनी केला.

त्याग हा आमचा इतिहास आहे
पश्चिम मतदारसंघातील भाजपचे इच्छुक उमेदवार राजू शिंदे म्हणाले, त्याग हा आमच्या पक्षाचा इतिहास आहे. राज्याच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस हे जर मुख्यमंत्री होणार असतील तर २५ वेळा आमच्या अपेक्षांचा भंग झाला तरी चालेल. आगामी निवडणुकीत पक्षादेश शिरसावंद्य असेल. त्यागाची परंपरा असलेला पक्ष आहे. जनसंघापासून ती परंपरा चालत आलेली आहे. पुढे काय होईल ते होईल; परंतु भाजपचा कार्यकर्ता म्हणून माझे काम सुरूच राहील.

निवडणुकीत भाजपला होणार फायदा
पैठण : वरिष्ठ पातळीवर राजकारणात आगामी काळात अनेक बदल होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद यामुळे वाढणार असल्याने भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला आनंद आहे. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असून, काम करणाऱ्यास पक्षात संधी दिली जाते. सध्याच्या राजकारणामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा होणार आहे. पैठणमधून भाजपच पुढे येईल, असे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांनी नमूद केले.

बऱ्यापैकी मोर्चेबांधणी
कन्नड : विधानसभा मतदारसंघ कन्नडमध्ये भाजपने मागील पाच वर्षांत बऱ्यापैकी बांधणी केलेली आहे. बूथनिहाय समित्या झाल्या आहेत. विस्तारकांचे काम सुरू असून, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी तालुका दत्तक घेतला आहे; तर रस्त्यांची कामे प्रस्तावित असल्याने आगामी काळात निवडणुका झाल्यास भाजपलाच यश मिळेल, असा दावा इच्छुक उमेदवार संजय खंबायते यांनी केला.

ते भाजपला साथ देणार
वैजापूर : महाविकास आघाडी सरकारवर जनता नाराज होती. भाजप-शिवसेना युती करून एकत्र लढले. मात्र दोन्ही पक्षांचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. भाजप-सेनेला जनतेने सरकार स्थापण्यासाठी स्पष्ट बहुमत दिले होते. परंतु काॅंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, हे जनतेला पटलेले नाही. त्यामुळेच शिवसेनेत बंडाळी निर्माण झाल्याने आमदारांचा मोठा गट बाहेर पडला. या गटाची भाजपला साथ देण्याची तयारी आहे. वैजापूर तालुक्यात भाजपचे चांगले काम आहे. या कामाच्या बळावरच आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा आगामी विधानसभेचे इच्छुक उमेदवार डॉ. दिनेश परदेशी यांनी स्पष्ट केले.

सिल्लोडमध्ये इच्छुकांची संख्या अधिक
सिल्लोड : आगामी काळात निवडणुका झाल्या, तर भाजपकडून सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघातून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर हे प्रमुख उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात. तसे पाहिले तर, या मतदार संघात अनेकजण निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार आहेत. त्यात प्रामुख्याने भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, प्रदेश चिटणीस इंद्रिस मुलतानी, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे आदींचा समावेश आहे. यात कोण उमेदवार असेल, हे सांगणे अवघड आहे.

Web Title: Confusion among BJP workers; Happiness if power comes to the state, anxiety of increasing local competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.