औरंगाबादेत केंद्रीय वक्फ समितीसमोर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:13 PM2018-09-29T23:13:51+5:302018-09-29T23:19:31+5:30
औरंगाबाद : वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचे भाडेकरार नियम २०१४ ची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायमूर्ती जकी उल्लाह खान यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेल्या सहा सदस्यांच्या समितीने शनिवारी मौलाना आझाद संशोधन केंद्रात बैठकीला सुरुवात केली. बैठकीत एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी दुपारी १ वाजता धुडगूस घातला. समितीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून कार्यकर्त्यांनी सदस्यांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या. घाबरलेल्या अवस्थेत समितीला पळ काढावा लागला.

केंद्र सरकारने वक्फ बोर्डाच्या मालमत्तांचे भाडेकरार नियम २०१४ तयार केला आहे. याची अंमलबजावणी व त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी माजी न्यायमूर्ती जकी उल्लाह खान यांच्या अध्यक्षतेखाली आर. एस. सक्सेना, अॅड. सय्यद शाहीद हुसेन रझवी, अॅड. टी. ओ. नौशाद, डॉ. अनिलकुमार गुप्ता, सदस्य सचिव बी. एम. जमाल या सहा सदस्यांची समिती गठीत केली आहे. ही समिती प्रत्येक राज्यांत जाऊन मुतवली आणि वक्फ मालमत्ताधारक यांच्याशी चर्चा करून भाडेकरार नियमातील अडचणी व सुधारणा करण्यासाठी उपाययोजना याबद्दल मत विचारात घेत आहे. न्यायमूर्ती जकी उल्लाह खान यांच्या नेतृत्वाखाली ही समिती दोनदिवसीय दौऱ्यावर औरंगाबादेत आली आहे. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात समितीने शहरातील मुतवली व वक्फ बोर्डाच्या मालमत्ताधारकांना बोलावले होते. यासाठी ५० ते ६० मुतवलींसह मालमत्ताधारक उपस्थित होते.
आमदार इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्ते समितीला भेटण्यासाठी आले. आ. जलील यांनी राज्यातील वक्फ मालमत्तांची माहिती दिली. काही मालमत्तांची परस्पर विक्री करण्यात आली. काही मालमत्ता इतर समाजातील नागरिकांना देण्यात आल्यामुळे मुस्लिम समाजातील होतकरू तरुणांना उद्योग व व्यवसायासाठी जागा मिळत नाही. समितीतील एका सदस्याने भाडेकराराच्या मुद्द्यावर बोला, इतर मुद्यांवर बोलू नका, असे सांगताच कार्यकर्ते चिडले. कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ सुरू केला. त्यांनी सदस्यांच्या दिशेने खुर्च्या भिरकावल्या. न्यायमूर्ती जकी उल्लाह खान यांच्यासह सदस्यांना आ.जलील यांनी हॉलमधील एका कोपºयात नेले. तेथून सदस्यांना वाहनातून पाठवून दिले.