वर्धमान पतसंस्थेतील गोंधळ : कागदपत्रांशिवाय २५ लाखांचे कर्ज
By मिलिंदकुमार साळवे | Published: November 21, 2018 11:42 AM2018-11-21T11:42:04+5:302018-11-21T11:42:07+5:30
राहाता तालुक्यातील वाकडी (गणेशनगर) येथील वर्धमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने संचालक मंडळातील नातेवाईकांना कर्ज देताना
मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर : राहाता तालुक्यातील वाकडी (गणेशनगर) येथील वर्धमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने संचालक मंडळातील नातेवाईकांना कर्ज देताना मेहेरनजर दाखविताना कर्जदार व जामीनदार यांच्या उत्पन्नाचे साधन न पाहता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नसतानाच नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याची बाब पतसंस्थेच्या चाचणी लेखापरीक्षणातून समोर आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार काले यांचे चिरंजीव प्रेमकुमार काले व दुसऱ्या एका संचालकाच्या नातेवाईकासह आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेशिवाय तब्बल २५ लाख रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची बाब या लेखापरीक्षणातून निष्पन्न झाली आहे.
सहकारी संस्थांचे वर्ग-१ चे विशेष लेखापरीक्षक एस.डी. कुलकर्णी यांनी सन २०१३-१४ च्या लेखापरीक्षण अहवालातून मुद्यांचे चाचणी लेखापरीक्षण करून २७ आॅगस्टला २०१८ ला आपला अहवाल अभिप्रायासह जिल्हा उपनिबंधकांना सादर केला आहे. त्यात कॅश क्रेडिट कर्जातील दोष निदर्शनास आणून देण्यात आले आहेत. त्यानुसार ज्येष्ठ संचालक राजकुमार काले यांचे चिरंजीव प्रेमकुमार राजकुमार काले यांना १५ लाखांचे कर्ज देताना अर्जात परतफेड मुदत नमूद नाही, अर्जदाराच्या नावे असलेल्या जिंदगीचा तपशील नाही.
कर्ज अर्जावर साक्षीदारांची नावे व सह्या नाहीत. जामीनदार क्रमांक २ ची सही नाही. संचालक मंडळाच्या ठराव क्रमांक ४ नुसार कर्ज मंजुरीचा उल्लेख असला तरी सभेचा दिनांकच नाही. कर्ज अर्जावरही दिनांक नाही. कर्जदार व जामीनदार यांच्या उत्पन्नाचे कागदपत्रे घेतलेले नाही. स्टॉक स्टेटमेंट घेतले नाहीत. कर्ज मुदत १ वर्षाची असताना कर्जाचे नूतनीकरण केलेले नाही.
कर्जदार व जामीनदार यांच्या उत्पन्नाचे साधन न पाहता कर्ज वाटप केले, या बाबी निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. दुसºया एका संचालकाचे नातेवाईक विलास किसनदास नाबरिया यांना १० लाख रूपयांचे कॅश क्रेडिट कर्ज देताना कर्ज अर्जात घरबांधणीसाठी कर्ज मंजूर केलेले आहे. या कर्ज अर्जावरही साक्षीदारांच्या सह्या नाहीत. दिनांक नाही. कर्जदार व जामीनदार यांचे उत्पन्नाचे साधन न पाहता कर्ज वाटप केल्याचा ठपका ठेवला आहे. कागदपत्रांची पूर्तता न करता कर्ज वाटप केल्याने कायदेशीर कार्यवाही करून कर्ज वसूल करावे. कर्ज वाटपाबाबत वारंवार तपासणी करणे आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे. या सर्व प्रकाराविषयी पतसंस्थेचे अध्यक्ष जयेंद्र काले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण अध्यक्ष असलो तरी सर्व कामकाज आमचे काका राजकुमार कालेच पाहत असून तेच याबाबत काही सांगू शकतील, अशी प्रतिक्रिया दिली.
अनियमितता जुन्या संस्थेची : काले
लेखापरीक्षणात ८ लाख ५६ हजार ३१५ रूपयांचा अपहार दाखविण्यात आला आहे़ ही अनियमितता आमच्या संस्थेची नसून संस्थेत विलिन करण्यात आलेल्या टाकळी ढोकेश्वरच्या वसंतदादा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील आहे. लेखापरीक्षणात कर्जप्रकरणात ज्या त्रुटी आढळल्या त्या दूर करण्यात आल्या आहेत़ प्रेमकुमार काले यांचे कर्ज खाते निल झाले आहे. विलास नाबरिया यांचेही ९० टक्के खाते निल झाले आहे. त्यामुळे संस्थेचे यात काहीही नुकसान झालेले नाही़ कामकाज नियमानुसार सुरू आहे़ असे वर्धमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक राजकुमार काले यांनी सांगितले़