ओबीसींच्या मेळाव्यात आधी गोंधळ, नंतर माफी

By | Published: December 6, 2020 04:05 AM2020-12-06T04:05:13+5:302020-12-06T04:05:13+5:30

औरंगाबाद : बहुजन विकास, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाडमध्ये शनिवारी झालेल्या ओबीसी ...

Confusion first at OBC meet, then apology | ओबीसींच्या मेळाव्यात आधी गोंधळ, नंतर माफी

ओबीसींच्या मेळाव्यात आधी गोंधळ, नंतर माफी

googlenewsNext

औरंगाबाद : बहुजन विकास, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करमाडमध्ये शनिवारी झालेल्या ओबीसी मेळाव्यात प्रास्ताविक करीत असताना बालाजी शिंदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या टीकेला आक्षेप घेत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. ‘अशी टीका सहन करणार नाही, छगन भुजबळ यांनी काय पाप केले’ असा सवाल निशांत पवार या कार्यकर्त्याने उपस्थित करीत शिंदे यांचे भाषण बंद पाडले. त्यांच्यासमोर असलेला पोडियम खाली पाडला. समता परिषदेचे मेळाव्याला आलेले कार्यकर्ते स्टेजसमोर गोळा झाले व त्यांनी ‘भुजबळ साहेब, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. भगवानबाबांचा विजय असो, या घोषणेने याला प्रत्त्युत्तर दिले जाऊ लागले.

पिवळ्या झेंड्यावर शरद पवार यांचे फोटो लावून छगन भुजबळ यांनी पुण्यात ओबीसींचा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. हे पाप होय. ओबीसींची ही दिशाभूल होय. याला आमचा विरोध आहे, अशी भूमिका बालाजी शिंदे मांडत होते. त्यावरून समता परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शेवटी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी, छगन भुजबळ यांची बदनामी सहन करणार नाही, असा इशारा देत झाल्या प्रकाराबद्दल माफीही मागितली.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वत: मंत्री वडेट्टीवार यांनी माईकचा ताबा घेतला. ‘भुजबळ साहेब, आमचे आदर्श आहेत. त्यांच्याबद्दल अनादर असण्याचे कारण नाही. ओबीसी संदर्भातील शासकीय उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत. आम्ही एकत्रच काम करीत आहोत. लवकरच आम्ही आमचा अहवाल शासनाला सादर करणार आहोत,’ असे सांगत तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.

‘‘जात, पात विसरून ३८२ घटकांच्या ओबीसी समूहाने ‘मी ओबीसी’ म्हणून लढा उभा केला तरच ओबीसी टिकेल. अन्यथा ओबीसींच्या अनेक पिढ्या गारद झाल्याशिवाय राहणार नाहीत’’ असा गंभीर इशारा वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.

.........

‘मी ओबीसी’

या विभागीय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रकाश शेंडगे होते. मेळाव्याचे प्रमुख संयोजक बाळासाहेब सानप होते. मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर ‘मी ओबीसी’ अशी अक्षरे लिहिलेली टोपी होती. मी ओबीसी लिहिलेले मास्कही वाटण्यात आले.

Web Title: Confusion first at OBC meet, then apology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.