गंगापूर साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वातावरण निवळले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 03:41 PM2022-06-13T15:41:51+5:302022-06-13T15:44:30+5:30
विद्यमान संचालक मंडळावर झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांना सत्ताधारी कशाप्रकारे उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गंगापूर : गंगापूर सहकारी साखर कारखानाची ४३ वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. परंतु, दुपारी अडीच वाजेपर्यंत कोरम पूर्ण न झाल्याने चार वाजेपर्यंत तहकूब करण्याचे अध्यक्ष बंब यांनी जाहीर करताच विरोधक सभासदांनी गोंधळ घालायला सुरवात केल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
१५ कोटी ७५ लाख अपहाराच्या आरोपामुळे संपूर्ण राज्यात गाजलेल्या व राज्य सहकारी बँकेने चौथ्यांदा निविदा काढलेल्या गंगापुर कारखान्याची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. कारखान्याच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांवर नोव्हेंबर २०२० मध्ये अपहाराचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर कोविडमुळे होणारी वार्षिक सभा ऑनलाईन पार पडली होती यावर्षी तालुक्यामध्ये अतिरिक्त झालेल्या अतिरिक्त उसाच्या उत्पादनामुळे कारखाना चालू व्हावा अशा शेतकऱ्यांचा भावना असून कारखाना २५ वर्षाकरिता भाड्याने दिला असल्याची चर्चा असतानाच वार्षिक सभा आयोजित केली आहे.
यामध्ये सर्व खुलासे होणार असून विद्यमान संचालक मंडळावर झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांना सत्ताधारी कशाप्रकारे उत्तर देणार याकडे देखील तालुक्याचे लक्ष लागले होते त्यामुळे सभा वादळी ठरणार असल्याचा अंदाज आल्याने पोलिसांनी सभास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता सभेत फक्त सभासदांनाच प्रवेश देण्यात आला होता. दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष आमदार बंब यांनी कोरम पूर्ण न झाल्याने सभा चार वाजेपर्यंत तहकूब केली. यामुळे विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले.