मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 05:45 PM2024-11-25T17:45:14+5:302024-11-25T17:47:33+5:30
आकडेवारीत तफावत असल्याची व्हायरल पोस्ट कन्नड मतदारसंघातील पराभूत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यापर्यंत गेली, त्यानंतर...
कन्नड : कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघांतील तळनेर येथील बुथ क्रमांक ८० वर २० नोव्हेंबर रोजी झालेले मतदान आणि दि. २३ नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होताना बुथ निहाय फेरी मधील मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याची एक पोस्ट सोशल मिडियात व्हायरल झाली आहे. पोस्टमधील आकडेवारीमुळे निवडणूक प्रक्रियेत गडबड झाल्याची चर्चा सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. याबाबत आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपले म्हणणे मांडले आहे.
आकडेवारीत तफावत असल्याची व्हायरल पोस्ट कन्नड मतदारसंघातील पराभूत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली. त्यांनी जाधव यांना ही बाब कळवली. त्यानंतर जाधव यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्या कार्यालयात धाव घेतली. गोरड यांच्याकडे त्यांनी लेखी खुलासा मागितला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले की, आकडेवारी लिहिताना मानवी चूक झाली आहे. आकडा ऐकण्यात चूक होऊन तळनेर बुथ क्रमांक ८० ऐवजी नेवपुर खा. येथील बूथ क्रमांक ८१ वरील संजना जाधव यांना मिळालेली ३२६ मतदानाची आकडेवारी लिहिण्यात आली. त्यामुळे आकडेवारीची एकूण बेरीज करताना तफावत झाली. ही हस्तलिखित आकडेवारी उमेदवारांच्या प्रतिनिधींनीची असून त्या आकडेवारीचा संगणकामधील अद्यावत आकडेवारीशी काहीही संबंध नाही, असा खुलासा गोरड यांनी केला.
पोस्टमधील दावा चुकीचा
फॉर्म २० व फॉर्म २१ याची स्वाक्षरीत प्रत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना दिली आहे. त्यामुळे आकडेवारीत कसलाही गोंधळ नाही. सोशल मीडियावर फिरत असलेली पोस्ट चुकीची आहे. ही एक मानवी चूक आहे.
- संतोष गोरड, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी
तक्रार दाखल करणार
मतमोजणी दरम्यान उमेदवारांचे प्रतिनिधी यांनी लिहिलेली आकडेवारी किंवा मतमोजणी करणारे कर्मचारी यांच्याकडून चूक कशी होऊ शकते. याबाबत निवडणूक आयोगाकडे दाद मागणार.
- हर्षवर्धन जाधव, अपक्ष उमेदवार